पुणे : ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी पुणे व अन्य शहरांमध्ये जावे लागते. आदिवासी अतिदुर्गम व दुष्काळी भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरातील राहण्याचा खर्च पेलवत नाही. यामुळेच जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १ कोटी २० लक्ष ६० हजार रुपये मंजूर करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासींवर अतिदुर्गम व दुष्काळी भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबईसह अन्य शहरामध्ये जावे लागते. परंतु शहरांमध्ये राहण्याचा खर्च या आदिवासी व सर्वसामान्य कुटुंबांतील मुलांना परवडत नाही. यामुळे त्याच्या शिक्षणाची परवड होते. यामुळेच आदिवासी मुलांना त्याच्या शहरामध्ये, गावांमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र, सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीत नाविन्यपूर्ण योजना हाती घेण्यात आली. या योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणीसाठी जिल्हा आदिवासी उपयोजना सन २१-२२ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत १ कोटी २० लक्ष ६० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
याबाबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, गेल्या (फेब्रुवारी) महिन्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे मी पत्राद्वारे हि मागणी केली होती. जुन्नर, नारायणगाव, ओतूर, निमगाव सावा याठिकाणी अभ्यासकेंद्रे उभारण्यासाठी निधी देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्याअनुषंगाने प्रथम जुन्नर शहरात जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिका केंद्र इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने पुणे मुंबई, नाशिक, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात जावे लागत आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम व दुष्काळी भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरातील राहण्याचा खर्च पेलवत नाही. जुन्नर तालुक्याच्या मध्यवर्ती भागात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्र सुरू करावी म्हणून विद्यार्थी वर्गाकडून वारंवार मागणी केली जात होती. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी जुन्नर तालुक्यात कुठेही अभ्यासिकेची सोय नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. हजारो विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जुन्नर तालुक्यातून शहरी भागात जात असतात. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन इमारत बांधकाम सुरू होईल, असे बेनके यांनी स्पष्ट केले.