पुणे : भारतीय जनता पार्टीच्या विराेधात आप आदमी पक्षाच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पर्वती मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या रॅलीनंतर निवडणूक आयाेगाच्या कार्यालयासमाेरच सभा घेतल्याचा आराेप आपचे काेथरुडचे उमेदवार डाॅ अभिजीत माेरे यांनी केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन ही सभा लाईव्ह देखील केली आहे.
अर्ज भरण्यासाठी उद्याचा एकच दिवस शिल्लक असल्याने आज राज्यातील अनेक दिग्गज उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी अनेकांनी शक्तीप्रदर्शन केले. पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली. या रॅलीत पुण्याचे खासदार गिरीष बापट, माजी शहराध्य याेगेश गाेगावले उपस्थित हाेते. रॅली अर्ज भरण्याच्या ठिकाणी आल्यानंतर तेथे भाजपाकडून छाेटेखानी सभा घेतल्याचा आराेप करण्यात येत आहे. गिरीश बापट, माधुरी मिसाळ यांनी उपस्थितांना संबाेधित केल्याचे माेरे यांचे म्हणणे आहे. निवडणूक कार्यालयाच्या 100 मीटरच्या परिसरात कुठलिही सभा घेण्यास निवडणूक आयाेगाच्या नियमांनुसार परवानगी नसते.
या सेभेचे त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन लाईव्ह केले असून भाजपावर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी भानूदास गायकवाड यांच्याकडे तक्रार दाखल केली. आयोगाकडून भाजपाला वेगळा न्याय आणि अन्य पक्षांना वेगळा न्याय दिला जात असून आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान आमदार मिसाळ यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले होते. मिसाळ अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेलेल्या असतानाच आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते त्यांचे उमेदवार संदीप सोनावणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आले. आयोगाच्या कार्यालयाबाहेर आप आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना डिवचण्यासाठी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.