पुणे : पाळीव प्राणी ही ज्याची त्याची आवड असते. पण पाळीव असताना अनेकांना प्रिय असणारे प्राणी जेव्हा मोकाट होता तेव्हा त्यांचा त्रास व्हायला सुरुवात होते. हेच उदाहरण पिंपरी चिंचवड महापालिकेत बघायला मिळाले असून त्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरिकांना येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'सारथी' संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर चक्क मांजरीच्याविरोधात तक्रारी येत आहेस. मांजरीच्या म्याव म्याव आवाजामुळे झोपेत व्यत्यय येत असल्याचे म्हटले आहे. त्यात शाहूनगर, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, अजमेरा कॉलनी, आकुर्डी-चिखली, साने चौक परिसराचा समावेश आहे. दुर्दैवाने महापालिकेकडे मांजरी पकड्ण्याचे पथक नसल्यामुळे या वाढत्या तक्रारींचे काय करायचे असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.