पुणे : चंद्रकांत पाटील यांनी काेथरुड विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी साडी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. या विराेधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विश्रांतवाडी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
भाऊबीजेच्या दिवशी चंद्रकांत पाटील यांच्याकडून काेथरुड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांच्या मार्फत घरकाम करणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. माेदींनी गरीबांसाेबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले हाेत. त्याचाच हा एक भाग असल्याचे पाटील यांचे म्हणणे हाेते. तसेच त्यांनी नागरिकांना देखील या उपक्रमात भाग घेण्याचे आवाहन केले हाेते. यावर आता मनसेने आक्षेप घेतला आहे. 30 ऑक्टाेबर पर्यंत आचारसंहिता लागू असताना 28 ऑक्टाेबरला पाटील यांनी साड्यांचे वाटप केले. त्या साड्यांवर पाटील यांचा फाेटाे हाेता. आचारसंहितेच्या नियमानुसार मतदानाआधी किंवा मतदानानंतर मतदारांना काेणत्याही प्रकारचे आमिष दाखविता येत नाही. असे असताना पाटील यांनी आचारसंहितेच्या काळात साड्या वाटप केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेकडून तक्रार अर्जात करण्यात आली आहे.
त्याचबराेबर या साड्या वाटण्यासाठी खर्च काेठून करण्यात आला याबाबत देखील चाैकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. दरम्यान पाटील यांच्या या साडी वाटपाच्या कार्यक्रमाला चंपा साडी सेंटर म्हणत राष्ट्रवादीकडून निषेध आंदाेलन करण्यात आले हाेते. तसेच जुन्या साड्या वाटण्यात आल्याचा आराेपही राष्ट्रवादीकडून करण्यात आला हाेता.