पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यातील काही वकील आणि कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
‘कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा’ असे विधान पाटील यांनी केले होते. त्याविरुद्ध काही वकील आणि विधि क्षेत्रातील इंटर्न विद्यार्थ्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांचे काही वैयक्तिक राजकीय मतभेद आणि नाराजी असली तरी पाटील यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. आम्ही राज्य महिला आयोगाला विनंती करतो की त्यांनी महिलांबद्दल विधान करण्यासंदर्भात राजकारण्यासाठी ’एसओपी’ आणि ’सिओसी’ तयार करावी. कोणतेही विधान करण्यापूर्वी संवेदनशीलता पाळावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मुंबई येथे करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी असंवेदनशील आणि स्त्रीत्वाचा अवमान करणारे विधान केले आहे. अशी विधाने पुरुषतत्ववादी दृष्टिकोन दर्शवतात की स्त्रिया घरातील कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी उपयुक्त नाहीत. पाटील यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. स्त्रीने काय करावे हे कोणत्याही स्त्रीला सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. स्त्रीने काय केले पाहिजे याबद्दल त्यांचे विचार सामान्य आणि रुढीवादी आहेत. महिला राजकारणासह सर्वच क्षेत्रांत आपले स्थान निर्माण करत आहेत आणि त्यांच्या मर्यादा सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या पुरुषांची समाजाला गरज नाही. कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध असलेली आमच्या तक्रारीची गांभीर्याने दाखल घ्यावी. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांमधील राजकारण्यांच्या महिला हक्कांच्या दृष्टिकोनातून एक संवेदनशीलता संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना करतो, असे ॲड. असीम सरोदे यांच्या कार्यालयातील ॲड. अजित देशपांडे, ॲड. अक्षय देसाई, ॲड. तृणाल टोणपे, ॠषिकेश शिंदे, सौरभ ठाकरे, सिद्धधी जागडे, प्रथमेश जैन, किम परेरा, एस. ए आव्हाड, स्वराली पुरंदरे, इशा मदाने आणि शिवांगी भातावडेकर यांनी तक्रारीमध्ये स्पष्ट केले आहे.