पुणे : अभिनेत्री पायल राेहतगीने शिवाजामहाराजांबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्यानंतर त्याचे पडसाद सर्वच स्तरात उमटले. तिच्यावर आता चहुबाजुंनी टीका हाेत आहे. संभाजी ब्रिगेडकडूनपुणे पाेलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज दाखल केला असून पायल राेहतगीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राेहतीगीला तात्काळ अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अगदी अलीकडे पायलने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते. त्यानंतर तिने शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्विट केले हाेते. शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय मराठा आरक्षणावरही आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले ? असा थेट सवालही तिने केला आहे.
यावर आता राज्यात संतापाची लाट पसरली आहे. संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडकडून पुणे पाेलीस आयुक्तलयाकडे तक्रार अर्ज दिला असून त्यात पायल राेहतगीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राेहगीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. ब्रिगेडने आपल्या तक्रार अर्जात म्हंटले आहे की पायल राेहतगी हिने शिवाजी महाराजांच्या जातीबद्दल आक्षेपार्ह विधान करुन त्यांचा शुद्र म्हणून उल्लेख केला आहे. या विधानामुळे इतिहासातील महापुरुषांची बदनामी करुन जाणीवपूर्वक सामाजिक शांततेचा भंग हाेईल असे कृत्य राेहतगी हिने केले आहे. हे ट्विट करुन राेहतगी हिने अखंड मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि सामाजिक असंताेष निर्माण केला आहे. त्यामुळे पायल राेहतगीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.
पायल रोहतगी पुन्हा बरळली, शिवाजी महाराजांवर लिहिली वादग्रस्त पोस्ट
दरम्यान पायल राेहतगीने आपल्या ट्विट बद्दल माफी मागितली असून भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याचे म्हंटले आहे.