पिंपरी : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)च्याही काही तक्रारी आल्या आहेत. अनेक उमेदवारांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही मते मिळाली नसल्याचे समोर आले आहे. काही उमेदवारांना अनपेक्षित मताधिक्य मिळाले आहे. ईव्हीएम यंत्रातील त्रुटीबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली. शहरात विकासकामे झाली असताना शहरवासीयांनी राष्ट्रवादीच्या विरोधात कौल दिला आहे. पराभव मान्य असून यापुढे राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून योग्य भूमिका निभावेल, असा निर्णय राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या चिंतन बैठकीत शनिवारी घेण्यात आला. खराळवाडीतील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चिंतन बैठक घेण्यात आली. तीत पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली. शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले, की लोकशाहीत जनतेने दिलेला कौल पक्षाला मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढे महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार आहे. पराभवाची कारणे शोधण्यासाठी प्रभागात जाऊन बैठक घेण्यात येणार आहेत. आजी-माजी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जातील. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्षसंघटनाचे काम आतापासूनच सुरू ठेवावे.या वेळी पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेविका अनुराधा गोफणे, नगरसेवक नीलेश पांढारकर, अरुण बोऱ्हाडे, महंमद पानसरे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे तसेच फजल शेख, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, विनोद कांबळे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित ३६ नगरसेवकांचा अभिनंदनाचा ठराव केला.(प्रतिनिधी)भाजपाकडून होतोयसत्तेचा दुरुपयोग भाजपाने केंद्र आणि राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करुन महापालिकेत सत्ता मिळविली आहे. निवडणूक प्रशासन, महापालिका, पोलीस प्रशासन यांना हाताशी धरून भाजपाने सत्ता मिळविली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वाघेरे यांनी केला आहे. पुढील काळात शहरातील पालिकेच्या सत्तेचाही दुरुपयोग रोखण्याची भूमिका राष्ट्रवादीला बजावावी लागणार आहे.
ईव्हीएम मशीनविषयी आयोगाकडे तक्रार
By admin | Published: February 26, 2017 3:46 AM