पुणे : माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर जमीन बळकाविल्याचा आणखी एक गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात दीपक मानकर यांच्या विरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात फसवणूक करुन जमीन बळकाविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हडपर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहगाव येथील जमीन बळकाविल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अदित माधव दीक्षित (रा. एरंडवणा, प्रभात रोड) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी साधना जयवंत वर्तक (रा. स्रेहा पॅराडाईज, पौड रोड), दीपक माधवराव मानकर (रा. पार्थ क्लासिक, भांडारकर रोड), वसुधा एंटरप्राईजेस (रा. झेनिथ कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर) ही भागीदारी संस्था व तिचे भागीदार तसेच उमेश सुभाष कोठावदे -वाणी (रा. मॉडेल कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विश्रांतवाडी येथील दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ८ येथे २३ जून २००४ रोजी घडली होती.
पिंपरी येथील जागेबाबत दिलेल्या विकसन करारनामाच्या लोहगाव येथील जमिनीसाठी वापर करुन लोहगाव येथील मिळकतीचा खोटा व बनावट विकसन करारनामा करुन तो दस्त खरा असल्याचे भासवून त्यांनी हेतूपुरस्परपणे व जाणून बूजून नोंदवून त्याचा वापर वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये केला. आदिती दीक्षित यांच्या वतीने कुलमख्यत्यारधारक म्हणून साधना वर्तक यांनी सही करुन ठरलेला मोबदला आरोपींनी स्वत: घेऊन दीक्षित यांची फसवणूक केली.
आदिती दीक्षित यांनी याअगोदर दीपक मानकर, साधना वर्तक यांच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यातही पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र जगताप यांच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी दीपक मानकर यांना अटक केली. त्यांच्यावर व त्यांच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांनी केलेल्या फसवणुकीबाबत गुन्हे दाखल होऊ लागले आहेत.