लष्कर: रुबी रुग्णालयातील युरो ओ पी डी मध्ये काम करणाऱ्या टेक्निशियन कर्मचाऱ्याने त्याच विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. तसेच या टेक्निशियनची एच आर विभागाला तक्रार करूनही कार्यवाही न करणाऱ्या एच आर विभागाच्या प्रमुख विरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार अत्याचार ग्रस्त महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात केली आहे. आरोपींविरुद्ध कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफ आय आर वरून असलेल्या माहितीनुसार, सदर महिला ही रुबी हॉस्पिटल मध्ये २००२ पासून काम करते. ती सध्या युरो ओ पी डी मध्ये कार्यरत आहे. एप्रिल २०२३ मध्ये येथील टेक्निशियन बाळकृष्ण शिंदे यांनी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. ती पूर्ण न केल्यास कामावरून कडून टाकेन अशी धमकी दिली होती. त्यामुळे या महिलेनं रुग्णालयातील दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यांसह रुग्णालय व्यवस्थापनाकडे शिंदे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एप्रिल २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात याबाबत एच आर प्रमुख प्रभाकर श्रीवास्तव आणि रुग्णालयाचे कायदा मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत सदर अर्जाबद्दल बैठक घेण्यात आली होती. मात्र एच आर प्रमुख प्रभाकर श्रीवास्तव यांनी सर्वांच्या समोर या महिलेला तू खोटे बोलत आहे, मला माहित आहे, तुझ्या शरीरावर आणि डाव्या हातावर कोठे कोठे डाग आहेत, असे बोलून महिलेची बाजू ऐकून न घेता उलट सर्वांसमोर त्या महिलेला लज्जा निर्माण होईल अशी बोलणी केली. त्यावर सदर महिलेने तुम्ही काय चेजिंग रुम मध्य कॅमेरा लावला आहे का अशी विचारणा केली.
याविषयी आम्ही महिलेची अधिकची माहिती घेतली असता. त्या लोकमत कडे म्हणाल्या की, माझ्या आंगवर आणि हातावर कुठे कुठे डाग आहेत हे एच आर ला माहीत आहे. म्हणजे त्यांनी स्त्रियांच्या चेंजिंग रूम मध्ये कॅमेरे लावले आहेत. आणि हा केवळ युरो विभागाचा विषय नसून रुबी रुग्णालयातील विविध विभागात कॅमेरे असतील आणि माझ्यासारख्या महिला अत्याचाराच्या प्रकरणे घडली असतील. यापूर्वीही अनेक महिला कामगारांच्या लैंगिक छळ आणि इतर तक्रारी आल्या आहेत. मात्र कामावरून कडून टाकले जाईल, इज्जत जाईल या भीतीने कोणी पुढे येत नव्हते.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिल्यावर केली तक्रार
एच आर मॅनेजरकडून कर्मचारी महिलांचा छळाच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर रुबी हॉल महिला कर्मचारी मिताली आचार्य आत्महत्या प्रकरण घडले होते. या प्रकरणाची थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यांचे खासगी सचिव संजय माशेलकर यांनी रुबी रुग्णालयातील प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची तब्बल ४ तास बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाला थेट धारेवरच धरले. कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील एचआर व्यवस्थापक, जनरल मॅनेजर यांच्याकडून कामगारांच्या होत असलेल्या छळाबद्दल पाढाच वाचून दाखवला. त्यानंतर आता या महिलेने एच आर मॅनेजर विरुद्ध एफ आय आर दाखल केला आहे.