पुणे : शिरूरचे तहसीलदार रणजित राजकुमार भोसले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तहसीलदार यांचा पाठलाग करून त्यांच्यावर पाळत ठेवणेबाबत तक्रार व गुन्हा दाखल केला. तहसीलदार रणजित भोसले यांच्या गाडीचा पाठलाग एका कारने रविवारी दुपारी केला. भोसले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात इनोव्हा कार (एम. एच. १६ बी. वाय००७७) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही गाडी दुपारी ३ वाजल्यापासून माझ्या गाडीचा पाठलाग करून लोकेशन घेत होती. एक दोन वेळा या गाडीला अडवण्याचा आणि त्यात कोण आहे हे पाहण्याचा पण प्रयत्न केला पण गाडी पळून गेली. रविवारी सायंकाळी ९.३० वाजता याबाबत तक्रार व गुन्हा दाखल केला, असे रणजित भोसले यांनी सांगितले.
रणजित भोसले हे रविवारी दुपारी कोरेगाव भीमाकडे जात असताना एक कार त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असताना निदर्शनास आले. तेव्हा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मी गाडी शिरसगाव काटा येथे जाण्यासाठी पुन्हा शिरूरच्या दिशेने वळवली. तेव्हा इनोव्हा कार पुन्हा त्यांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आले. पुढे सणसवाडी पेट्रोलपंप येथे पेट्रोल भरण्यासाठी गाडी आत घेतली. तेव्हा बाहेर येऊन इनोव्हा कारच्या दिशेने तपासणी केली असता वेगाने ती निघून गेली. या गाडीत पुढील बाजूस अंदाजे दोन व्यक्ती बसले होते. त्यामुळे माझ्या गाडीचा पाठलाग करणारे कोणीतरी वाळू माफिया असावे. कारण त्यांना अनधिकृत वाळू वाहतूक करणे सोयीचे व्हावे. यासाठी माझ्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये तहसीलदार रणजित भोसले यांनी नमूद केले असून, कारवाईची मागणी केली आहे.