पुणे : वर्गातील विद्यार्थी डान्सचा सराव करण्यासाठी गेलेले असताना वर्गातील विद्यार्थ्याने वर्गातीलच एकट्या विद्यार्थिनीला मारहाण करुन जखमी केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली. याप्रकरणी सदर अल्पवयीन शाळकरी मुलासह विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असणार्या वर्गशिक्षकेविरुध्द बालकांची काळजी आणि संरक्षण कायदा अधिनियम २०१५चे कलम ७५ सह मारहाण करुन जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,येरवडा येथील एका शाळेत वर्गातील इतर विद्यार्थी डान्सच्या सरावासाठी वर्गाबाहेर गेले होते. यावेळी वर्गातील पिडीत विद्यार्थिनी एकटी असताना वर्गातीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने तिला पट्टीने गुप्तांगावर मारहाण करुन जखमी केले. दरम्यान या घटनेत विद्यार्थिनीची काळजी घेण्याची जबाबदारी असणार्या वर्गशिक्षिकेनेदेखील दुर्लक्ष केल्याने या प्रकरणी दोघांवरही येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिडीत विद्यार्थिनीला त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. पिडीत विद्यार्थिनीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मनिषा टुले करीत आहेत.