पुणे : कुलमुखत्यारपत्र करून दिलेल्या जमीन मालक व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही तो जिवंत असल्याचे दाखवून जागा नावावर करून बळकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा, पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात संदीप दाभाडे यांनी जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालयात नव्याने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी त्यांनी अगोदर डिसेंबर २०२१ मध्ये बंडगार्डन पोलीस ठाणे व सक्तवसुली संचालनालय यांच्याकडे तक्रार दिली होती.
पूनम शत्रुघ्न सिन्हा, कुश सिन्हा यांच्याविरोधात कारवाई आता जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कक्षेत असून, कारवाईचे अधिकार त्यांच्याकडे असल्याने तिकडे पाठपुरावा करावा, असे लेखी उत्तर बंडगार्डन पोलिसांनी संदीप दाभाडे यांना दिले आहे. त्यानुसार आता नव्याने तक्रार करण्यात आली आहे.
वाघोली येथील जमीन (गट क्रमांक १३३१/१ क्षेत्र १ हेक्टर आणि ५५ आर ) स्वतः व साथीदार यांचे नावावर करून बळकाविल्याची सिन्हा कुटुंबीय आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध ही तक्रार आहे.
संदीप दाभाडे यांची वडिलोपार्जित जमिनीचे कुलमुखत्यारपत्र त्यांचे पिता गोरखनाथ दाभाडे यांनी पूनम शत्रुघ्न सिन्हा, कुश सिन्हा यांना २००२ व २००४ मध्ये दिले होते. गोरख दाभाडे २००७ साली निधन झाले. गोरखनाथ दाभाडे मृत झाल्यानंतरदेखील ते जिवंत असल्याचे घोषणापत्र आणि प्रतिज्ञापत्र सन २००९, २०१० मध्ये तयार करून देऊन व त्याचा उपयोग करून पूनम शत्रुघ्न सिन्हा, कुश सिन्हा यांनी स्वतःचे व साथीदारांच्या नावे त्या जमिनीचे विक्रीपत्र नोंदवले. दुय्यम निबंधक हवेली- ११ यांचे कार्यालयात हे विक्रीपत्रे नोंदविताना गोरखनाथ दाभाडे हे मृत झाले असतानाही त्यांच्या वतीने कबुलायातसुद्धा पूनम शत्रुघ्न सिन्हा व इतर यांनी दिली आणि स्वाक्षऱ्यासुद्धा केल्या, असा दावा संदीप दाभाडे यांनी केला आहे.