पुणे : कोट्यवधी रुपयांचा बोजा डोक्यावर असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळावर (पीएमपी) आता तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. मागील दोन महिन्यांपासून तक्रारींमध्ये चौपटीने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन, बसला स्थलदर्शक फलक नसणे, बस बंद पडणे, खिडकीला काचा नसणे, वाहतुकीचे नियम मोडणे अशा विविध तक्रारी सध्या तक्रार निवारण कक्षाकडे येत आहेत. मात्र, कक्षाकडून आलेल्या तक्रारींचे समाधानकारक निवारण केले जात असल्याचे सुखद चित्रही दिसून आले.मागील काही महिन्यांपासून ‘पीएमपी’ची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने शेकडो बस बंद अवस्थेत आहे. तर काही बस जुन्या स्पेअर पार्ट वापरून रस्त्यावर आणल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना या बसमधून चांगल्याप्रकारे सेवा देणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या अनेक बसेसची अवस्था पाहिल्यानंतर प्रवाशांच्या संयमाला दाद द्यावीशी वाटते. मात्र, आता प्रवाशांकडून या संयमाला तक्राररुपाने वाट करून दिली जात आहे. त्याला भाडेवाढीचीही साथ मिळाली आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव आल्यापासूनच प्रवाशांमध्ये पीएमपीच्या सेवेबद्दल प्रश्न विचारले जावू लागले आहे. परिणामी तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांत तर तक्रारींचा जणू पाऊसच पडला आहे.पीएमपीमध्ये २०१० मध्येल तक्रार निवारण कक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून दर महिन्याला साधारणत: सरासरी ७०० ते ८०० तक्रारी येत होत्या. मात्र, दोन महिन्यांत विक्रमी तक्रारी आल्या आहेत. आॅगस्ट महिन्यात केवळ ६८३ तक्रारी आल्या होत्या. तर नोव्हेंबरमध्ये हा आकडा ४७४४ पर्यंत जावून पोहोचला आहे. तर डिसेंबर महिन्यात बुधवारपर्यंत २५५८ तक्रारी आल्या आहेत. महिनाअखेरपर्यंत यात आणखी वाढ होवू शकते. या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी गैरवर्तनाच्या आहेत. त्यामध्ये बसला पुढे व मागे स्थलदर्शक फलक न लावणे, वाहकाकडून उद्घटपणे बोलणे, तिकीट न देणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, स्थानकावर बस न थांबविणे, अशा तक्रारींचा समावेश आहे. यासह बस उशिरा येणे, खिडकीला काचा नसणे, आॅईलची गळती, बस बंद पडण अशा तक्रारी अधिक आहेत.(प्रतिनिधी)
पीएमपीवर तक्रारींचा पाऊस
By admin | Published: December 26, 2014 4:50 AM