प्रभागांची अदलाबदल झाल्याच्या तक्रारीपुणे : महापालिका निवडणुकीसाठी मतदारांना स्लिपा मिळायला सुरुवात झाल्यानंतर अनेक मतदारांचे प्रभागच बदलले गेले असल्याच्या तसेच काहींची नावेच मतदार यादीतून गायब झाली असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. मतदार याद्यांमधील या घोळामुळे मतदानाच्या वेळी यामुळे गोंधळ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडून मंगळवारी बुथनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतरच अनेक ठिकाणी प्रभागातील मतदारांच्या अदलाबदली झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येण्यास सुरुवात झाली होती. त्याचबरोबर आता मतदारांना निवडणुकीच्या स्लिपा हातात पडल्यानंतर आपले नाव दुसऱ्याच प्रभागात नोंदविले गेले असल्याचे पुढे येत आहे. पालिका प्रशासनाकडे याबाबतच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.औंधमधील एका महिला मतदाराचे नाव प्रभाग ८ ऐवजी प्रभाग ७ मधील मतदान केंद्रामध्ये दाखविण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील एका महिला मतदाराचे नावच यादीतून वगळले गेले आहे. येरवडा येथील एकाच घरातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रामध्ये आली आहेत. अनेक मतदारांना घराजवळचे मतदार केंद्र सोडून लांबच्या केंद्रात मतदानासाठी जावे लागणार आहे. महापालिकेच्या वतीने ४१ प्रभागांमधील ३ हजार ४४२ मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये प्रभाग १७ मध्ये सदाशिव पेठेतील मतदारांची नावे आल्याची तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेच्या ४१ प्रभागनिहाय मतदारांची प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यावर १७ जानेवारीपर्यंत हरकती व तक्रारी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ९०९ तक्रारी निवडणूक विभागांकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार मतदार यादीमध्ये बदल करण्यात आले होते. मात्र तरीही अनेक प्रभागांतील मतदारांची अदलाबदल कायम राहिली असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
प्रभागांची अदलाबदल झाल्याच्या तक्रारी
By admin | Published: February 21, 2017 3:23 AM