पुणे : हुंड्यापायी महिलांचा मानसिक आणि शारीरिक छळ होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून, सहकारनगर, येरवडा आणि हडपसर अशा तीन विविध ठिकाणी पतीसह कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनकवडीतील २६ वर्षीय महिलेला तिच्या माहेरच्यांनी लग्नामध्ये एकही संसारोपयोगी वस्तू दिलेली नाही अशी सातत्याने टोचणी देत सोन्याची चेन घेऊन ये अशी मागणी सासरच्यांनी करून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी तिने सहकारनगर पोलीस ठाण्यात सासरच्यांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पती निलेश प्रकाश तोरे, सासू नंदा प्रकाश तोरे, सासरे प्रकाश मारुती तोरे आणि नणंद अश्विनी अडसूळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत एका २३ वर्षीय महिलेकडे माहेरकडून रोख रक्कम, दागिने अशा मागण्या करून तिला उष्ट अन्न खाण्यास देऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. तसेच पती एका गंभीर मानसिक आजाराने त्रस्त असून तो औषधांमुळे वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध करु शकत नाही ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवण्यात आली. या कारणांमुळे तिने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार पती कुलदीप वाघ (३१ रा. देवपूर धुळे), सासरे दिलीप रघुनाथ वाघ , सासू प्रतिभा दिलीप वाघ, चुलत सासरे संदीप रघुनाथ वाघ (रा. नाशिक), लालचंद रघुनाथ वाघ (कळवा ठाणे), मामा सतीश बाळूदास भामरे (रा. धुळे) आणि आजेसासू कमला बाळूदास भामरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना फुरसुंगीत घडली आहे. एका १९ वर्षीय तरुणीला वडिलांकडून १० लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला अशी फिर्याद तिने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानुसार पती अजित फडतरे, दीर अक्षय बाळासाहेब फडतरे आणि सासू शैला बाळासाहेब फडतरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.