पुणे : टीईटी परीक्षेमध्ये परीक्षार्थींबाबत तत्कालीन राज्य परीषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे हा व्यवस्थित काम करीत नसल्याच्या तक्रारी जी. ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतीश देशमुख याने तत्कालीन शालेय शिक्षण उपसचिव सुशील खोडवेकर याच्याकडे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
सायबर पोलिसांनी नुकतीच तत्कालीन शालेय शिक्षण उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली. त्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर पोलिसांनी पोलीस कोठडी अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सुशील खोडवेकर यांना अटक केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
सायबर पोलिसांनी तुकाराम सुपे, डॉ. प्रीतीश देशमुख, सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्याकडे केलेल्या तपासात हे चौघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. तसेच मनोज डोंगरे याच्यामार्फत देशमुख आणि तुकाराम सुपे यांनी सुशील खोडवेकर यांना लाखो रुपये दिल्याचे उघड झाले आहे. तसेच त्यांचे व्हॉटसॲप चॅट तपासले असताना ते एकमेकांशी संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. त्यात काही वेळा देशमुख याने खोडवेकर याच्याकडे तुकाराम सुपे यांच्याविषयी तक्रारी केल्या आहेत. सुपे हे सांगितल्याप्रमाणे काम करत नाहीत, असे त्यात म्हटले आहे. सावरीकर आणि देशमुख यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
एजंटाची शोधमोहिम
टीईटी गैरव्यवहारात २०१९ - २० मध्ये या वरिष्ठ अधिकार्यांनी एजंटांना हाताशी धरुन तब्बल ७ हजार ८८० जणांना पैसे घेऊन पात्र ठरविले होते. त्यांच्याकडून २५ हजारांपासून १ लाख रुपयांपर्यंत पैसे घेण्यात आले आहे. त्यात अनेक क्लासचालकांनी एजंटाची भुमिका बजावली आहे. अशा ३० ते ३५ जणांची माहिती सायबर पोलिसांच्या हाती लागली असून त्याचा शोध घेतला जात आहे. हे प्रमुख एजंट हाती लागल्यानंतर त्यांच्याकडून या संपूर्ण व्यवहारावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.