पुणे : शहरात जानेवारीमध्ये होणाऱ्या जी २० परिषदेसाठीच्या तयारीने वेग घेतला आहे. शहरातील सुशोभीकरणाची कामे ८ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या परिषदेदरम्यान शहरातील कोणतेही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार नाहीत.
पुण्यात जी २० देशांच्या परिषदेच्या जानेवारी आणि जूनमध्ये तीन बैठका होणार आहेत. यासाठी विविध ३४ देशांचे १२० ते १३० प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. पहिली बैठक १५ ते १७ जानेवारीदरम्यान होईल. याबाबत सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेलमध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी, केंद्र सरकारच्या गृह तसेच राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलिस आयुक्त रितेशकुमार, यांच्यासह महापालिका व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाहुण्यांना विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम व गाला डिनरची मेजवानी
जी २० बैठकीसाठी १४ जानेवारीपासून प्रतिनिधी येणार असून त्यापैकी काही १८ जानेवारीपर्यंत मुक्कामी असतील. १५ ते १७ बैठक होणार आहे. तर १६ तारखेला सायंकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम व गाला डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वी या प्रतिनिधींसाठी जाधवगढी आणि शनिवारवाड्याची भेट आयोजित करण्यात आली होती; परंतु, आता हे प्रतिनिधी आपल्या इच्छेनुसार ऐतिहासिक वास्तूंना भेट देतील. या परिषदेचे सदस्य ज्या रस्त्याने ये-जा करणार आहे. त्यासह शहरातील कोणतेही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार नाहीत, असेही आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.