पुणे: आयकर विभागाचे अधिकारी (पाहुणे) असा उल्लेख पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला त्रास (डिस्टर्ब) द्यायचा नाही. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर मी पुढे सगळे बोलणार आहे. ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशीच बोलणार आहे. मी येथेच आहे. कोठेही पळून जाणार नाही. तसेच मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. याबाबत मला कोणतीही नोटीस आलेली नाही, अशा खरपूस शब्दात आयकर विभागाकडून होत असलेल्या कारवाईबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला.
विधानभवन येथे कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार म्हणाले, की माझी भूमिका स्वच्छ असते. मी सरळमार्गी आहे. कोणी कर बुडवू नये, म्हणून मी नागरिकांना आवाहन करत असतो. कराचा हा पैसा राज्याच्या विकासासाठी वापरण्यात येतो. त्यामुळे आर्थिक शिस्त मोडायची नाही. तर एका साखर कारखान्यामध्ये दरवर्षी सुमारे ५०० ते ७०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. काहींना साखर कारखाने चालवायला जमले नाहीत. ते कारखाने देशोधडीला लागले आहेत. काही कारखान्यांना एफआरपीची रक्कम देणे सुध्दा शक्य झाले नाही.
कोणत्याही कंपनीवर धाडी टाकण्याचा ‘त्यांना’ अधिकार
आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री पवार यांचा मुलगा पार्थ तसेच नातेवाईकांच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी दुसऱ्या दिवशीसुध्दा सुरु आहे. आता चौकशी सुरु आहे. आयकर विभाग त्यांचे काम करत आहे. आजसुद्धा हे काम सुरु आहे. आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर धाडी टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे ? काय अयोग्य आहे ? याची ते चौकशी करतात. त्यांच्या चौकशीमध्ये मला व्यत्यय आणायचा नाही. त्यांची चौकशी झाल्यावर मी बाेलेन, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
किती कारखाने कसे विकले, कोणी विकले हे पुराव्यानिशी दाखवणार
राज्यातील एकूण किती कारखाने विकले गेले. ते कोणत्या किंमतीला विकले गेले आहेत. तसेच ते कोणी विकत घेतले. कोणामुळे विकले गेले. त्याचबरोबर त्या कारखान्याचा मालक कोण आहे. सध्या तो कारखाना कोण चालवत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या सर्व कारखान्यांची विक्री करताना नियमांचे पालन झाले की नाही. हे सर्व मी पुराव्यानिशी दाखविणार आहे, असे सांगत अजित पवार यांनी विरोधी पक्षाला आव्हान दिले आहे.