खोडद: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण (बायपास) रस्त्यावरील सुरक्षाविषयक कामे महिनाभरात पूर्ण करा, तसेच मोशी ते चांडोली रस्त्याच्या सहापदरीकरण कामाची सुरुवात चाकण चौकातील पुलाच्या कामाने करण्याचे नियोजन करा, अशा सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या समवेत आयोजित केलेल्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, विभागप्रमुख दिलीप शिंदे, थोरात, गरड आदी अधिकारी उपस्थित होते.
मोशी ते चांडोली रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याची सुरुवात चाकण चौकातील पुलाच्या कामाने करावी ही महत्त्वाची सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे प्रकल्प संचालक चिटणीस यांनी मान्य केले.
नारायणगाव व खेड घाट बायपास रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहे, तरीही अद्याप सुरक्षाविषयक आणि विद्युतीकरणाची कामे बाकी आहेत. ही कामे अर्धवट असताना रस्ता वाहतुकीसाठी खुला केला तर अपघातांची शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बायपास रस्त्यांची पाहणी करणार आहोत. त्यावेळी कामांचा आढावा घेऊन दोन्ही बायपास रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याबाबत निर्णय घेता येईल, असे खा. डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
नारायणगाव-खोडद रस्त्यावरील पाटेवस्ती चौकातील भुयारी मार्गाच्या कामाचा समावेश तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्याचा प्रस्ताव, तसेच जैदवाडी जंक्शन सपाटीला एसएनजी महाविद्यालयासमोर स्थलांतरित करण्याचाही प्रस्ताव पाठविल्याची माहिती प्रकल्प संचालक चिटणीस यांनी या बैठकीत दिली.
आगामी दोन वर्षांत मोशी ते चांडोली रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी माझे प्रयत्न असून मी प्रत्येक स्तरावर या कामावर लक्ष ठेवणार आहे. ६-७ वर्षे ठप्प झालेले बायपास रस्त्यांचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन मी जनतेला दिले होते. त्यानुसार नारायणगाव व खेड घाट बायपास रस्ते अंतिम टप्प्यात आहेत, तर उर्वरित कळंब, मंचर, राजगुरुनगर आणि आळेफाटा येथील कामे सुरू झाली आहेत, तर मोशी ते चांडोली रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदार निश्चित झाला आहे. येत्या काही दिवसांत हे काम सुरू होणार आहे. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यात आपण यशस्वी होत असल्याचे समाधान खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.
नारायणगावच्या प्रवेशद्वारावर ऐतिहासिक कलाकृती उभारावी
अपघाताची ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर जुन्नर हा पर्यटन तालुका घोषित झाला आहे. त्यामुळे नारायणगाव प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व तालुक्यातील पर्यटन व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवणारी चांगला कलाकृती निर्माण करण्याची सूचनाही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. त्यासाठी आवश्यकता भासल्यास आपण स्वयंसेवी संस्था, सीएसआर आदी मदत करण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगितले. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव लवकरच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्याचे आश्वासन प्रकल्प संचालक चिटणीस यांनी दिले.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग मार्गी लागला असून, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचे भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. भूसंपादनाचे काम लवकर मार्गी लावून प्रत्यक्ष रेल्वेलाईनचे काम सुरू करण्यावर आता आपण लक्ष केंद्रित करणार आहे.
डॉ. अमोल कोल्हे, खासदार