लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आगामी पावसाळ्याच्या कालावधीत येणारे आजार, तसेच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता लक्षात घेता ज्या बालकांचे नियमित लसीकरण करण्याचे राहून गेले आहे, अशा बालकांच्या पालकांनी शासकीय किंवा खासगी केंद्रावर जाऊन बालकांना लस द्यावी असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव व कोविडसाठी गठित बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्या बालकांचे नियमित लसीकरण करण्याचे राहून गेले आहे, अशा बालकांच्या पालकांनी शासकीय किंवा खासगी केंद्रावर जाऊन बालकांना लस द्यावी. ज्यामुळे त्यांना विविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होईल. सर्व शासकीय व महानगरपालिका, तसेच खासगी केंद्रांवर विविध आजारास प्रतिबंधक लसींची उपलब्धता आहे. त्याचा लाभ सर्व पात्र बालकांना देऊन त्यांना संरक्षित केले पाहिजे. अनाथाश्रम, वसतिगृहे, अनुरक्षणगृहे, रिमांड होम व कारागृहामध्ये आईसोबत राहणाऱ्या बालकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.