पुणे : पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे होऊ नये, पाणी साचू नये व रस्ते नादरूस्त अवस्थेत राहू नये, यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज व विद्युत विभागांनी आपल्या कांमासाठी रस्त्यांवरील खोदाईची कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत. अशा सूचना महापालिकेच्या पथ विभागाने दिल्या आहेत. दरम्यान १ मे नंतर या तीनही विभागांकडून खोदाई झाल्यास, खोदाईनंतर त्या रस्त्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी संबंधित विभागाची राहिल. असे पत्र महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिले आहे.
महापालिकेच्या पथ विभागाकडून १ मे ते १५ जूनपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांचे रिईनस्टेटमेंट व रिफरफेसिंगची कामे करण्यात येणार आहेत. पावसाळा कालावधीत रस्त्यांवर खड्डे पडू नयेत, पाणी साठवून राहू नये, रस्ते ना-दुरूस्त होऊ नये व पर्यायाने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पाणीपुरवठा, ड्रेनेज व विद्युत विभागाकडील सर्व खोदाईची कामे ही ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करणे गरजेचे असल्याचे पावसकर यांनी सांगितले. तसेच ३० एप्रिलपर्यंत या तीनही विभागांकडून कोणत्या रस्त्यांवर खोदाईची कामे हाती घेण्यात येणार आहेत, त्याचा तक्ता पथ विभागाला त्वरित सादर करावा असेही सूचित करण्यात आले आहे.
अस्ताव्यस्त खोदाई नको
समान पाणी पुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा विभागाकडून शहरात सध्या मोठ्या प्रमाणात खोदाई होत आहे. याचबरोबर ड्रेनेज व विद्युत विभागाकडूनही रस्त्यावर खोदाई होत आहे. ही खोदाई करताना संबंधित ठेकेदाराकडून अस्ताव्यस्त व आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात रस्ते खोदले जातात. त्यामुळे कामासाठी आवश्यक असलेला रस्त्याचा भागच खोदला जावा असे पथ विभागाने सांगितले आहे. ही खोदाई करताना सिमेंट क्रॉक्रिट रस्त्यावर ज्या प्रमाणेने कटरने खोदाई होते, त्याचप्रमाणे डांबरी रस्त्यावरही खोदाई करून आवश्यक तोच भाग खोदला जावा असे पावसकर यांनी सांगितले.