पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील मैदानाच्या काही भागांवर काही महिन्यांपासून सुरू असलेले चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिग्दर्शक नागराज मंजूळे यांना देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कारविजेते मंजूळे हे फुटबॉलशी संबंधित विषयावर हिंदी चित्रपट बनवत आहेत. त्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांचीही भूमिका असणार आहे. त्याच्या चित्रीकरणासाठी मंजूळे यांनी विद्यापीठाच्या मैदानातील काही भागांची परवानगी मागितली होती. हा चित्रपट खेळावर आधारित असल्याने विद्यापीठाकडून त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला होता व त्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र, हे चित्रीकरण काही कारणामुळे लांबले. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने मंजूळे यांना चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंजूळे यांनीही ते मान्य केले आहे. त्यांनी चित्रीकरणासाठी मैदान वापरण्याचा कालावधी वाढवून मिळावा, अशी विनंती केली होती. हा विषय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत ठेवण्यात आला होता. परिषदेने त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यापीठाने केवळ ४५ दिवसांसाठी आणि पूर्वपरिस्थितीत करण्याच्या अटीवर साडेसहा लाख रुपये भाडे आकारून मैदान चित्रीकरणासाठी दिले होते. पण १२० दिवस उलटूनही चित्रीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पूर्ण मैदान उपलब्ध होऊ शकत नाही. तसेच जिल्हा प्रशासनानेही त्यावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, संबंधितांकडून पूर्ण १२० दिवसांचे भाडे वसूल करण्यात यावे व ही रक्कम विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान लवकारात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यापीठाकडे करण्यात आली. या वेळी अध्यक्ष ऋषी परदेशी, जितेंद्र राठोड, सवेंदु शिंदे, विक्रम जाधव, विशाल मोरे, राज पाटील, रवी अमरावती, प्रतीक कांबळे, यश कांबळे उपस्थित होते.
कधी संपणार चित्रीकरण?विद्यापीठाने मान्यता न घेता मैदान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिल्याचे दिसून येत आहे. याबाबत शहर तहसील कार्यालयाने ठपका ठेवला असून कारवाईबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याबाबत राज्याच्या उच्च शिक्षण विभागानेही याबाबत चौकशी सुरू केली असून विद्यापीठाकडून अहवाल मागविला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने चित्रीकरण लवकर करण्याची सूचना मंजूळे यांना दिली आहे. मात्र, नेमका हा कालावधी किती असेल, हे विद्यापीठाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे चित्रीकरण आणखी किती दिवस चालणार, हे गुलदस्त्यातच राहणार आहे.
चित्रीकरण थांबवावेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेले चित्रपटाचे चित्रीकरण तातडीने थांबवून विद्यार्थ्यांसाठी मैदान खुले करून द्यावे, अशी मागणी भीम आर्मी संघटनेने विद्यापीठाकडे केली आहे. विद्यापीठाकडून मैदानासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले जाते. असे असूनही चित्रीकरणासाठी मैदान उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे बेकायदेशीरपणे मोठ्या कालावधीसाठी मैदान देऊ नये, अशी मागणी संघटनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पोळ यांनी केली.