खेड शिवापूर/वेळू : पुणे-सातारा रस्त्याची रखडलेली कामे, पुलांची दुरवस्था तसेच वाढलेला टोल या विरोधात भोर व हवेली तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने मंगळवारी पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात आले. गेले अनेक वर्षे पुणे-सातारा रोडवरील कात्रज बोगदा ते सारोळापर्यंतच्या रस्त्याची अवस्था एकदम दयनीय आहे. अनेक ठिकाणी पुलांची चाललेली संथ कामे, सेवा रस्त्याची दुरवस्था त्यामुळे या भागात प्रवास करणे एकदम जिकिरीचे झाले आहे. असे असतानाही टोलवसुली मात्र जोरात चालू आहे. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी सांगितले. कोंडे म्हणाले, की या रस्त्याची कामे वेगात व्हावी यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिली. आंदोलन केली. येत्या महिन्याभरात जर सेवा रस्ते व अपूर्ण पुलांची कामे चालू झाली नाही तर १ जानेवारीपासून या ठिकाणी टोलवसुली करू देणार नाही. आज हे आंदोलन लोकशाही पद्धतीने करतोय. भविष्यात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तसेच दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल. याला सर्वस्वी जबाबदार टोल आणि रोड प्रशासन असेल. प्रशासन तसेच महामर्गाचा विकास करणारी कंपनी रिलायन्स इन्फ्राचे व्यस्थापक बी. के. सिंग यांनी या वेळी येत्या महिन्याभरात अपूर्ण सेवा रस्ते व पुलांची कामे कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून देण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, भोर तालुका उपसभापती अमोल पांगारे, महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, भोर तालुकाप्रमुख माऊली शिंदे, आदित्य बोरगे, युवा नेते लाला रेणुसे, रोहिदास कोंडे, अशोक वाडकर तसेच नागरिक उपस्थित होते. शिवसेनेतर्फे रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अपूर्ण कामांमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघाताची जबाबदारी रोड प्रशासनाने स्वीकारून अपघातग्रस्तांना आर्थिक मदत करावी. सद्यस्थितीत कात्रज बोगदा ते सारोळा दरम्यानच्या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तर मुख्य रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. स्थानिक नागरिकांची या टोलनाक्याच्या जाचातून सुटका नाही. दररोज या टोलनाक्यावर होणारी स्थानिकांची लूट आता थांबलीच पाहिजे, या उद्देशाने सामान्य नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते.
आधी रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण करा; नंतरच टोलवसुली ; खेड शिवापूर टोलनाक्यावर शिवसेनेचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:46 PM
गेले अनेक वर्षे पुणे-सातारा रोडवरील कात्रज बोगदा ते सारोळापर्यंतच्या रस्त्याची अवस्था एकदम दयनीय आहे.
ठळक मुद्देरिलायन्स इन्फ्राला दिले निवेदन .. तर १ जानेवारीपासून या ठिकाणी टोलवसुली करू देणार नाही