पुणे : भूमी अभिलेख विभागाने तलाठी कार्यालयापाठोपाठ मंडल अधिकाऱ्यांच्या स्तरावर (सर्कल) देखील फस्ट इन, फस्ट आउट (फिफो) ही ऑनलाईन प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीमुळे नक्की कोणत्या स्तरावर किती विलंब लागला याची माहिती कळणार असल्याने, सातबारा आणि फेरफारची कामे वेगवान होणार आहेत.राज्यातील तलाठी कार्यालयामध्ये सातबारा आणि फेरफार नोंदी करण्यासाठी फिफो प्रणाली भूमी अभिलेख विभागाने या पूर्वीच सुरू केली आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयाचा कारभार काही प्रमाणात सुरळीत झाला आहे. सातबारा आणि फेरफारच्या पुढील कार्यवाहीसाठी मंडल अधिकाऱ्यांकडे व पुढील अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन कागदपत्रे पाठविली जात होती. तलाठी कार्यालयाकडून कागदपत्रे दिल्यानंतर देखील या नोंदी वेळेवर होत नव्हत्या.जाणीवपूर्वक नोंदी करण्यास विलंब लावला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. तसेच, या विलंबामुळे गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तविली होती. त्याची दखल घेऊन भूमी अभिलेख विभागाने फिफो ही प्रणाली मंडल अधिकाºयांना देखील लागू केली. या प्रणालीमुळे दस्तनोंदणीच्या वेळी थेट सातबारा आणि फेरफार नोंदी देखील घेतल्या जाणार आहेत. या नोंदीवर हरकतीसाठी १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. हरकत आली नाही, तर अठराव्या दिवशी सर्कल स्तरावर ती नोंद मंजुरीसाठी जाणार आहे. सर्कल अधिकाऱ्यांकडून त्याच दिवशी संबंधित नोंद अंतिम केली जाईल. त्याशिवाय सर्कल अधिकाऱ्यांना त्यापुढील नोंदी घालता येणार आहेत. क्रमवारीनुसारच नोंदी घालाव्या लागणार आहेत. त्यामुळे ओळख अथवा अन्य कोणतेही प्रलोभन देऊन कोणाच्या नोंदींना प्राधान्य द्यायचे, ही पद्धत देखील आता बंद होणार आहे.‘फिफो’ही कार्यप्रणाली मंडल स्तरावर सुरू केल्याने तलाठी व मंडल कार्यालयातील कामकाजास शिस्त येण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाºयांनी दिली.
सातबारा-फेरफारचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 7:12 PM
सातबारा आणि फेरफारची कामे वेगवान होणार
ठळक मुद्देमंडल अधिकारीही कक्षेत : फस्ट इन फस्ट आऊट प्रणाली लागू