पुणे : महापालिकेच्या हद्दित नव्याने समाविष्ट होणाऱ्या ३४ गावांच्या खर्चाचे सादरीकरण अहवाल महापालिका प्रशासनाने बुधवारी पूर्ण केला. महापालिका हद्दित समावेश करायच्या नव्या गावांच्या स्वागताची जणू तयारी पूर्ण झाली आहे.हे सादरीकरण राज्य शासनास पाठविण्यात येणार असून त्याचा आढावा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी घेतला. प्रमुख १५ विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यात रस्ते, पाणी, आरोग्य या सारख्या पालिकेच्या पायाभूत सुविधांपासून ते शाळा, उद्याने आणि इतर नागरी सुविधांसाठी इमारतीसाठी लागणाऱ्या आवश्यक खर्चावर चर्चा करण्यात आली. या ३४ गावांचा समावेश होणार असल्याचे संकेत नुकत्याच संपलेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनीच दिले होते. या गावांमध्ये काही मूलभूत सुविधा सध्या ग्रामपंचायतीमार्फत दिल्या जात असल्या, तरी पालिकेतील समावेशानंतर स्थानिक नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेवरच येणार आहे. त्यादृष्टीने, प्रत्येक विभागाच्या तयारीचे सादरीकरण आयुक्तांसमोर करण्यात आले. यामध्ये, काही विभागांनी अपेक्षित खर्चाची आकडेवारी सादर केली नसल्याने येत्या दोन दिवसांत सर्व तपशील सादर करावे, अशा सूचना आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)४राज्य शासनाच्या पातळीवर ही गावे महापालिकेत समावेश करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. ४दत्यामुळे ही गावे पालिकेत आल्यास तत्काळ त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी मिळावा या उद्देशाने महापालिका प्रशासनाकडून ही खर्चाची आकडेवारी संकलित करण्यात येत आहे.
नव्या गावांच्या स्वागताची तयारी पूर्ण
By admin | Published: April 30, 2015 12:15 AM