पिंपरी : मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी लोकसभेत केली. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७चे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे व दुरुस्तीचे कामाचे नियोजन केले होते. पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरी देखील संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. खासदार बारणे म्हणाले, ‘‘संपूर्ण देशामध्ये रस्ते विकास मंत्रालयाकडून रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वरील काम मात्र गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरूआहे. याचा फटका सदरच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना, तसेच शालेय विद्यार्थी व गोवा, अलिबाग, रायगड, सिंधुदुर्ग या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. या संबंधी नागरिकांनी तक्रारी केल्या. पाच वर्षांपासून या कामामध्ये प्रगती नसल्याने या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना या असुविधांचा त्रास सहन करावा लागत आहे.’’ (प्रतिनिधी)
गोवा-मुंबई मार्गाचे काम पूर्ण करावे
By admin | Published: August 04, 2016 1:32 AM