पुणे : शहराच्या मध्य भागासह उपनगरात गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येत आहे. यंदा मंगळवारी हा उत्सव साजरा हाेत आहे. या पार्श्वभूमीवर शहर, उपनगरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाेलिसांनी बंदी घातलेली असतानाही दहीहंडीत प्रखर लेझर दिवे, उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर हाेत आहे.
अनेक मंडळांनी खास लेझर शो आयोजित केला असून, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली येथील ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवणाऱ्या व्यावसायिकांना पाचारण केले आहे. यावर लाखो रुपये खर्च करण्यात येणार असून, रविवारी रात्रीपासूनच मध्य भागासह उपनगरातील मंडळांच्या परिसरात लोखंडी सांगाडे उभे करून त्यावर लेझर दिवे लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. या लेझर लाईट्सचा अनेकांना त्रास झाला होता. काहींच्या डोळ्यांना इजा झाली होती. ध्वनिवर्धकांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पोलिस आयुक्तालयात मानाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यंदा विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेझर लाईट्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले.
डोळ्यांना इजा पोहोचविणाऱ्या लेझर प्रकाशझोतावर बंदी घालण्याचे आदेशही सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशाकडे कानाडोळा करून मध्य भागासह उपनगरातील मंडळांनी दहीहंडीनिमित्त ‘लेझर शो’ची तयारी सोमवारी (दि. २६) सकाळपासून केली आहे.
ध्वनिवर्धक, लेझर लाईट्सबाबत दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करणे गरजेचे आहे. दहीहंडीनिमित्त शहराच्या मध्य भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गैरप्रकार तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची पथके तैनात केली आहेत. - संदीपसिंग गिल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १.