डॉ. सुभाष साळुंके : ‘महाराष्ट्रातील कोविडची दुसरी लाट- आव्हाने आणि उपाय’ या विषयावर ऑनलाइन चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “कोविडच्या संकटाला तोंड देण्यासाठी व्यापक शास्त्रीय धोरण हवे. कोविडग्रस्तांना प्राणवायूसकट उपचारांच्या सोयी युद्धपातळीवर मिळाल्या पाहिजेत. त्याचसोबत रुग्णसंख्या घटवण्यासाठी दर्जेदार संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सोयींमध्येही तातडीने वाढ व्हायला हवी,” असे मत काेरोनाबाबत राज्य सरकारचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांनी व्यक्त केले.
जन आरोग्य अभियानातर्फे ‘महाराष्ट्रातील कोविडची दुसरी लाट- आव्हाने आणि उपाय’ या विषयावर ऑनलाइन चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. साळुंखे बोलत होते.
विद्या चव्हाण म्हणाल्या, “संकटाचा सामना करण्यास एकटे सरकार पुरे पडणार नाही. जनतेचे प्रबोधन करून सरकारने जनतेचे सहकार्य घ्यायला हवे.”
डॉ. अभय शुक्ला म्हणाले, “कोव्हिडग्रस्तांना प्राणवायूसकट उपचारांच्या सोयी करण्यासाठी मुंबई, केरळ मॉडेलचे सार्वत्रिकीकरण, महात्मा फुले योजनेतील खासगी हॉस्पिटलच्या संख्येत वाढ, म. फुले योजनेतील हॉस्पिटल्समधील ८० टक्के खाटा कोव्हिड रुग्णांसाठी राखीव करणे, सरकारी हॉस्पिटल्समध्ये आलेल्या रुग्णांसाठी तिथे जागा नसेल तर त्यांना दुसरीकडे हलवून सरकारी खर्चाने उपचार देण्याची व्यवस्था, लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी केंद्राने उचलणे, ८०% लसी सरकारसाठी व २०% खासगी केंद्रांसाठी एकाच दराने तर पुरवण्याचे उत्पादकांवर बंधन; वंचित, दुर्बल घटकातील लोकांचे लसीकरण मागे पडणार नाही याची खास काळजी इ. अशी पावले उचलण्याची गरज आहे.”