पुणे : पुणे शहरात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक शाखेकडून वाहनचालकांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात येणार आहे़ नव्या वर्षातही हेल्मेटसक्ती बरोबरच वाहनचालकांना सक्तीचे समुपदेशन करण्यात येणार आहे़दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी ७, १४, १८ आणि २१ डिसेंबर रोजी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ विनाहेल्मेट दुचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना समुपदेशन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात येत होती़ या प्रत्येक कार्यक्रमाला साधारण ५०० ते ६०० दुचाकी वाहनचालक उपस्थित असल्याचे दिसून आले़ या सर्व कार्यक्रमाचे नियोजनासाठी वाहतूक शाखेने समुपदेशन सेल सुरू केला आहे़गेल्या चार दिवसांत ज्या वाहनचालकांवर विनाहेल्मेट कारवाई करण्यात आली़ त्यांना बुधवारी सकाळी ११ वाजता शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात होणाऱ्या समुपदेशन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ त्याचप्रमाणे २७ डिसेंबरला हेल्मेटसक्तीची कारवाई करण्यात येईल, त्यांना २८ डिसेंबर तसेच २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी नोटीस बजावण्यात येणार आहे, त्यांना १ जानेवारी २०१९ ला समुपदेशन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तारीख देण्यात येणार आहे़या समुपदेशनासाठी नागरिकांना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात बोलविण्यात येते़ त्या ठिकाणी त्यांना काही फिल्म दाखविल्या जातात़ हेल्मेट न घातल्याने अपघातात दुचाकीस्वारांचा कसा मृत्यू झाला, हे दर्शविण्यात येते़ त्याचबरोबर हेल्मेट परिधान करणे व चारचाकी वाहनचालकांनी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करणे कसे आवश्यक आहे, हे वाहतूकतज्ज्ञांमार्फत उपस्थितींच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो़ हा संपूर्ण कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालतो़ उपस्थित राहिलेल्या सर्वांची नोंद घेतली जाते़ या सर्व प्रकारामध्ये अर्धा दिवस जात असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे वाहनचालक पुढे वाहतूक नियमांचा भंग करण्यापूर्वी नक्कीच गंभीरपणे विचार करतील, अशी वाहतूक शाखेची अपेक्षा आहे़नव्या वर्षात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असून, जे वाहनचालक हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे वगैरेसारख्या नियमांचा भंग करतील, त्यांना दंड शुल्क वसूल करण्यापूर्वी, समुपदेशनास दुसºया दिवशी उपस्थित राहण्याची नोटीस देण्यात येणार आहे़१ जानेवारीपासून ८ जानेवारीपर्यंत सलग आठ दिवस समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़
हेल्मेटसक्तीबाबत दंडाबरोबरच सक्तीचे समुपदेशन, नववर्षापासून मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 2:25 AM