पुणे : लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने एका संगणक अभियंत्याला १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ८ मार्च २०२१ पासून आतापर्यंत घडली आहे.
याप्रकरणी केतन सुनील पळशीकर (वय ३६, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन भरत नीलेश कुमार (वय २६, रा. रोपसी जालोर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी केतन पळशीकर हे संगणक अभियंता असून, लॅपटॉप विक्रीबरोबरच ते दुरुस्तीचा व्यवसाय करतात. भरत कुमार हा घाऊक लॅपटॉप विक्री करतो. त्यातूनच त्यांचा आर्थिक व्यवहार झाला होता. सुरुवातीला फिर्यादींनी आरोपीला आरटीजीएसद्वारे ५ लाख रुपये दिले. त्यानंतर आणखी १० लाख रुपये दिले. असे एकूण १५ लाख रुपये भरत कुमारला दिले़. मात्र, ठरल्याप्रमाणे त्याने फिर्यादींना लॅपटॉप दिले नाहीत. याबाबत फिर्यादीने तक्रार अर्ज विश्रामबाग पोलिसांकडे दिला होता. त्यांच्या अर्जाची पडताळणी करुन पोलीस उपायुक्तांच्या परवानगीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे अधिक तपास करीत आहेत.