लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या शुद्धलेखनाच्या चुका संगणकामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रश्न टाईप करताना ‘फॉन्ट’ वेगळा आल्याने या चुका झाल्या आहेत. प्रश्नपत्रिकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यापूर्वी त्याची परिषदेकडून अंतिम तपासणी केली जात नसल्याचेही यानिमित्ताने पुढे आले आहे.परिषदेकडून राज्यात दि. २२ जुलै रोजी ‘टीईटी’ घेण्यात आली. शिक्षकांना पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळून आल्या आहेत. जवळपास १५० चुका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. परीक्षेचे काम परिषदेकडून एका खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. या एजन्सीमार्फत प्रश्नपत्रिकांची छपाई, त्याचे वितरण व इतर काम केले जाते. परिषदेने नेमलेल्या विषय तज्ज्ञांकडून अंतिम प्रश्नपत्रिका तयार केली जाते. त्याचे हस्तलिखित संबंधित एजन्सीला छपाईसाठी दिले जाते. एजन्सीकडून संबंधित प्रश्न टाईप करून त्याची छपाई केली जाते. प्राथमिक माहितीनुसार प्रश्न टाईप करतानाच चुका झाल्या असल्याचा अंदाज आहे. तसेच छपाई झाल्यानंतर परिषदेशी संबंधित कोणताही घटक प्रश्नपत्रिकेची तपासणी करीत नाही. त्यामुळे या चुका अंतिम प्रश्नपत्रिकेतही तशाच राहिल्या. विशेष म्हणजे इंग्रजी व उर्दु माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत अशा चुका आढळून आलेल्या नाहीत.
शुद्धलेखनात ‘संगणका’ची चूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 3:03 AM