नीलेश राऊत- पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम १६ जानेवारीपासून सुरू झाले असले तरी, लसीकरणाकरिता तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीमुळे व ‘को-विन अॅप’ मधील तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणास उशिर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना ही लस दिली जाणार आहे. त्यानुसार पुणे महापालिका हद्दीत शासकीय व खाजगी संस्थांमधील सुमारे ५६ हजार सेवकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नावनोंदणी केली आहे. या सर्वांची नावे संगणकीय प्रणालीे व ‘को-विन अॅप’ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीमुळे दिवसाला एका केंद्रावर शंभर अशा प्रमाणेच नोंदणी केलेल्या सेवकांची नावे येत आहेत. त्यातच या प्रणालीमुळे वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने संबंधित लाभार्थ्यांना वेळेत लसीकरणाचा एसएमएस न जाण्याचे प्रकारही घडत आहेत. या सर्व घटकांचा परिणाम शहरातील पहिल्या टप्प्यातील लसीकरणावर होत आहे.--------------१६ जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरूवात झाली. परंतु, पहिल्या दिवशी पुणे शहरात सर्वाधिक कमी लसीकरण झाल्याची नोंद घेतली गेली. लसीकरणासाठी केंद्रांची उभारणी केली गेली तरी, त्या केंद्रावर ज्या आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार आहे, त्या सेवकांपर्यंत या संगणक प्रणालीतून एसएमएस वेळेत गेले नसल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे. त्यातच ज्यांची नावे त्या दिवसाच्या शंभर जणांच्या यादीत आहेत, त्यापैकी काही आरोग्य सेवक आदल्या दिवशी रात्रपाळीला कामावर असतात, अथवा एक दिवसापूर्वीच पूर्वकल्पना नसल्याने काही जण बाहेर गावीही गेलेले असतात. तसेच ज्यांची नावे आहेत, त्यांना कोरोनाची लागण होऊन कोरोनामुक्त झाल्याच्या दिवसात अद्याप दोन महिने पूर्ण झाली नाहीत. अशा विविध समस्या सध्या समोर येत आहे.---------------------------मॅन्युअली प्रक्रिया सोयीस्कर पुणे शहरात सुमारे ५६ हजार आरोग्य सेवकांनी लसीकरणासाठी नाव नोंदणी केली आहे. या सर्वांना संगणकीय प्रणालीमुळे व ‘को-विन अॅप’ व्दारे लसीकरणासाठीची वेळ दिली जाते. मात्र , हीच वेळ त्या आरोग्य सेवकाच्या कामाच्या सोयीनुसार, कोरोनामुक्त होऊन विधित कालावधी पूर्ण झाल्याचे पाहून दिली गेल्यास दिवसाला प्रत्येक केंद्रावर शंभर जणांना लस दिली जाऊ शकते. यामुळे शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्प्यात वेळेत आरोग्य सेवकांना लसीकरण होऊ शकते. याकरिता या प्रणालीबरोबरच मॅन्युअली प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष आरोग्य सेवकाशी बोलून त्याची वेळ घेणे व लसीकरणासाठी बोलविल्यास लसीकरण लवकरात लवकर होऊ शकते असे लसीकरणाची प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणचे म्हणणे आहे. --------------------------लसीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्रात वाढ होणार पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभी शासन आदेशानुसार शहरात १६ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती़ पण आजमितीला ही संख्या २५ वर नेण्यात आली असून, येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. गुरूवार दि. ४ फेब्रुवारी शहरात १ हजार ७८६ जणांना लस देण्यात आली असून, ही टक्केवारी ८९़३ टक्के इतकी आहे.-----------------------------