लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम १६ जानेवारीपासून सुरू झाले असले तरी, लसीकरणाकरिता तयार केलेल्या संगणकीय प्रणालीमुळे व ‘को-विन अॅप’मधील तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणास उशीर होत असल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे लसीकरणात अडचणी येत आहेत.
शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना ही लस दिली जाणार आहे़ त्यानुसार पुणे महापालिका हद्दीत शासकीय व खाजगी संस्थांमधील सुमारे ५६ हजार सेवकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नावनोंदणी केली आहे़ या सर्वांची नावे संगणकीय प्रणालीे व ‘को-विन अॅप’ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे़ मात्र या प्रणालीमुळे दिवसाला एका केंद्रावर शंभर अशाप्रमाणेच नोंदणी केलेल्या सेवकांची नावे येत आहेत़ त्यातच या प्रणालीमुळे वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने संबंधित लाभार्थ्यांना वेळेत लसीकरणाचा एसएमएस न जाण्याचे प्रकारही घडत आहेत़ या सर्व घटकांचा परिणाम शहरातील पहिल्या टप्प्यातील लसीकरणावर होत आहे़
१६ जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली़ परंतु, पहिल्या दिवशी पुणे शहरात सर्वाधिक कमी लसीकरण झाल्याची नोंद घेतली गेली़ लसीकरणासाठी केंद्रांची उभारणी केली गेली तरी, त्या केंद्रावर ज्या आरोग्यसेवकांना लस देण्यात येणार आहे, त्या सेवकांपर्यंत या संगणक प्रणालीतून एसएमएस वेळेत गेले नसल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे़
अनेक समस्या समोर
ज्यांची नावे त्या दिवसाच्या शंभर जणांच्या यादीत आहेत, त्यापैकी काही
आरोग्यसेवक आदल्या दिवशी रात्रपाळीला कामावर असतात, अथवा एक दिवसापूर्वीच पूर्वकल्पना नसल्याने काही जण बाहेर गावीही गेलेले असतात़ तसेच ज्यांची नावे आहेत, त्यांना कोरोनाची लागण होऊन कोरोनामुक्त झाल्याच्या दिवसांत अद्याप दोन महिने पूर्ण झाले नाहीत़ अशा विविध समस्या सध्या समोर येत आहे़
---------------------------