बारामती : शाळांमधील संगणक चोरून विक्री करणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाख ६५ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावामधील शिरसाई विद्यालयातील संगणक चोरीला गेले होते. त्याचा तपास करीत असताना ही टोळी उघडकीस आली. त्यांनी बारामती, वडगाव निंबाळकर, यवत, करमाळा, फलटण या ठिकाणी देखील या प्रकारचे गुन्हे केले आहेत. या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, उपअधीक्षक संभाजी कदम, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपींना जेरबंद केले. या संदर्भात माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले की, आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केले आहेत. शिरसाई विद्यालयाच्या संगणक कक्षाची खिडकी कापून आॅगस्ट २०१४ मध्ये आरोपींनी प्रोजेक्टर, २ संगणक आणि इतर साहित्य असा १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे करीत होते. या तपासा दरम्यानच आरोपी अनुराज प्रकाश लोंढे व त्याचे साथीदार प्रशांत चंद्रकांत लोंढे, सुनिल बाळासाहेब माकर, अजय दत्तात्रय मांढरे (सर्व रा. उंडवडी सुपे, ता. बारामती) यांना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी ओमनी व्हॅन (क्रमांक एमएच १२/एनए ८३४५), मोटारसायकल तसेच ५४ सीपीयू, ७७ मॉनिटर, ३ प्रोजेक्टर आणि अन्य साहित्य असा १३ लाख ६५ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्यावर १५ वेगवेगळे गुन्हे २०१३ आणि १४ या वर्षात दाखल झाले आहेत. ४तपास केला असता या आरोपींनी गोजूबावी, पारवडी, अंजनगाव, उंडवडी कडेपठार, मुर्टी, देऊळगाव रसाळ, कारखेल, पाटस (ता. दौंड), जिंती, टाकळी, कुंभारगाव (ता. करमाळा), फलटण येथील शाळांमधील संगणक साहित्य चोरल्याचे कबुल केले. ४चोरलेले संगणक अमित तानाजी शिंदे (रा. इंदापूर, श्रीराम सोसायटी), संतोष राजाराम सूळ (रा. फलटण) यांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले. ४अमित शिंदे याच्याकडून १० लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तर संतोष सूळ याच्याकडून २ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
शाळांमधील संगणक चोरणारे गजाआड
By admin | Published: January 05, 2015 11:03 PM