लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : निगडी येथील परिमंडळ कार्यालयांतर्गत असलेल्या शिधापत्रिकेतील माहितीचे संगणकीकरण करण्याचे कामकाज सुरू आहे. या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. निगडीतील परिमंडळ कार्यालयात अ आणि ज विभागाचे कामकाज चालते. या विभागांतर्गत येणाऱ्या शिधापत्रिकेतील सर्व माहिती संगणकावर घेतली जाणार आहे. शिधापत्रिकाधारकाची संपूर्ण माहिती युनिट संख्या, आधार क्रमांक, धान्य वितरणाचे प्रमाण आदी माहिती यामध्ये असेल. सध्या सुरुवातीला अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकांचे कामकाज सुरू आहे. या योेजनेतील लाभार्थींना धान्य वितरणासाठी ही माहिती सोयीची ठरणार आहे. शिधापत्रिकाधारकांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असून, दुकानदारांना इपॉज मशीन दिली जाणार आहे. दरम्यान, लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डद्वारे धान्य दिले जाणार आहे. शिधापत्रिकेतील माहितीचे संकलन करण्याच्या कामकाजाचे येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या माहितीचे संगणकीकरणाचे कामकाज वेगात सुरू असून येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. माहितीचे संगणकीकरण झाल्यास नवीन नाव टाकणे, कमी करणे, बदल करणे अशा प्रकारचे कामकाज तातडीने होण्यास मदत होणार आहे. पेपरलेस कारभार होणार आहे. तसेच आगामी काळात आॅनलाइन कामकाज करण्यासाठी या माहितीचे संगणकीकरण केल्याचे फायदेशीर ठरणार आहे.
शिधापत्रिकेतील माहितीचे होणार संगणकीकरण
By admin | Published: May 07, 2017 3:06 AM