पुणे : सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करणे गरजेचे आहे. या महिनाअखेरपर्यंत ३०० तालुक्यांतील सातबारा संगणकीकरणाचे नियोजन करून कार्यवाही करावी, असे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले.राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांसाठी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत पाटील बोलत होते. महसूल व मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोकणचे जगदीश पाटील, नाशिकचे राजाराम माने, औरंगाबादचे पुरुषोत्तम भापकर, नागपूरचे अनुपकुमार आणि अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह या वेळी उपस्थित होते.सुटीच्या कालावधीत महसूल कार्यालयात येणाऱ्या सैनिकांना जलद सुविधा मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याबाबत विचार विनिमय करण्याची सूचना पाटील यांनी केली. तसेच संगणकीकरणात अमरावती विभागाचे काम शंभर टक्के झाल्याबद्दल विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांचे पाटील यांनी अभिनंदन केले. स्वाधीन क्षत्रीय म्हणाले, ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार कामकाज होण्यासाठी राज्य शासन भर देत आहे. यासाठी विभागीय आयुक्तांनी दरमहा जिल्हाधिकाºयांकडून याबाबत आढावा घ्यावा. तसेच कायद्याची जनजागृती आणि अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत.’
महिनाअखेर ३०० तालुक्यांतील सातबारे संगणकीकृत करा - चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:32 AM