लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : महाराष्ट्र शासन व तहसील कार्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे चावडी वाचन विशेष मोहीमेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हस्तलिखित व संगणकीकृत सात बाऱ्यांचे वाचन तसेच दुरुस्ती करून वृक्षारोपण करण्यात आले. शासनाने दारात येऊन शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानचे भाव उमटू लागले आहेत.गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या विशेष मोहिमेचे उद्घाटन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, सरपंच सुभाष वाडेकर, उपसरपंच संगीता पोतले, मंडलधिकारी डी. एन. खोमणे, ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे, तलाठी आर. बी. सूळ, अध्यक्ष शरद मोहिते, उपतालुकाप्रमुख बापूसाहेब थिटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हस्तलिखित तसेच संगणीकृत सातबारे कागदपत्रांमध्ये त्रुटी राहू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या मालकीच्या सातबाऱ्यांचे त्यांच्या समोर अर्थात चावडी वाचन करण्यात आले. सुमारे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेत सहभाग घेऊन कागद पत्रांवरील चुकीच्या दुरुस्त्या करून घेतल्या. परिणामी या दुरुस्तीच्या कामासाठी प्रशाकीय कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे वाचले असून वेळही वाचण्यास मदत झाली आहे. गावातील शेतकऱ्यांच्या मालकीनुसार सातबाऱ्यावर सह्या घेण्यात आल्या. याप्रसंगी तलाठी एस.व्ही. मुंगारे, डी. डी. केंगले, आर. एल. ओढुणे, आदींसह अन्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात हा उपक्रम राबविल्याने गावातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान गावातील नागरिकांनी वृक्षारोपण मोहिमेत उस्फूर्त सहभाग नोंदवून परिसरात नव्याने झाडांची लागवड केली.
संगणकीकृत सात-बाऱ्यांची दुरुस्ती; शेतकऱ्यांमध्ये समाधान
By admin | Published: July 06, 2017 2:44 AM