पुणे : ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना केवळ एक दृष्टी नाही, तर भारतासाठी स्वावलंबन व शाश्वत विकासासाठी आखलेली आर्थिक रणनीती आहे. त्यात खासगी क्षेत्रासह सर्व क्षेत्रात विपुल संधी उपलब्ध आहेत. तसेच इनोव्हेशन व रोजगार निर्मितीचे अनेक मार्ग या संकल्पनेद्वारे उघडले जाणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी केले.
सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या वतीने आयोजित ११ व्या ‘सिम्सआर्क २०’ या वार्षिक आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत ‘भारताचे ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट : संधी व आव्हाने’ या विषयावर ठाकूर बोलत होते. या ऑनलाईन कार्यक्रमास सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, सिंबायोसिस इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक ब्रिगे. (डॉ.) राजीव दिवेकर,डॉ. आरती चंदानी उपस्थित होते.
अनुरागसिंग ठाकूर म्हणाले की, कोरोनामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून उद्योगधंद्यांमध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूतीसाठी व पुनरुज्जीवनासाठी, संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहेत. वार्षिक वाढ दर, जीडीपी, एफडीआय, महागाई, रोजगार, एकूण बचत, तंत्रज्ञान प्रगती, वित्तीय तूट घटक हे भारताला एक बळकट अर्थव्यवस्था म्हणून पुढे आणतील, असेही ठाकूर यांनी यावेळी नमूद केले.
गुंतवणुकीसाठी जागतिक बाजारपेठेत भारत प्रमुख पसंतीचा देश आहे. देशातील तरुणांना भविष्यासाठी तयार करून जगातील सर्वात मोठे कुशल कार्यशक्तीचे केंद्र बनविणे हे केंद्र सरकारचे ध्येय आहे. तसेच २०२० हे वर्ष ऐतिहासिक सुधारणांचे, तांत्रिक परिवर्तन आणि संकटाच्या पार्श्वभूमिवर सुध्दा संधींचे वर्ष म्हणून ओळखले जाईल, असेही ठाकूर यांनी सांगितले.