समाविष्ठ गावांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे गावात गुंतवणूक वाढवली पाहिजे. गुंतवणूक, टॅलेंट आणि काम या गोष्टी एकत्र आणल्यास या क्षेत्रात गृहनिर्माणाला मोठी आणि आणखी चालना मिळेल.
बांधकाम व्यावसायिकांनी समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा विचार करायला हवा. सर्वसामान्य आणि धनाढ्य असा कोणताही भेदभाव न करता सर्वच वर्गातील लोकांना घर पुरविणे हे ध्येय असावे, कोरोनाकाळात दीड वर्षांपूर्वी फ्लॅटबाबत चौकशी केली जात होती. त्यानंतर सरकारने स्टँप ड्युटीत सवलत जाहीर केली. बँकांच्या व्याजदरात कपात झाली. त्यामुळे घरखरेदीकडे नागरिकांचा कल वाढला. जून आणि जुलैमध्ये बुकिंग चौपटीने वाढले. आपले घर असावे आणि घरखरेदीत दिलेल्या सवलतींचा लाभ का सोडायचा? या भावनेने घरखरेदीकडे कल वाढल्याचे दिसून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान घरापेक्षा मोठी घरे खरेदीकडे कल वाढला आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या नात्याने सर्वच बांधकाम व्यावसायिकांनी काम केले पाहिजे. पुण्यातील वाकड, हिंजवडी यासारख्या भागात वर्क फ्रॉम होम मोठ्याप्रमाणात सुरु झाले. कोरोनामुळे नागरिकांना प्रशस्त घरे हवी आहेत. वर्क फ्रॉम होममुळे आता घरातच वर्कींग स्टेशन आहे. त्यादृष्टीने घरांचे आराखडे तयार होत आहेत. त्याचबरोबर पुण्यातील आरोग्य सुविधा सर्वात चांगल्या आहेत. त्यामुळे पुण्याबाहेरील मंडळी पुण्यात स्थायिक होण्याचा विचार करू लागल्याचे दिसले. पुण्यात बांधकाम व्यवसायाला चांगल्या संधी आहेत. मध्यवर्ती शहर असल्याने अनेक शहरांशी ते सहज जोडले जाते शहराच्या विस्ताराला मोठी संधी आहे. परवडणारी घरे तयार केल्यास बांधकाम व्यवसायाला मोठी संधी पुण्यात आहे.
पुण्यातील अनेक टाऊनशिपमध्ये वीज आणि पाणीपुरवठा यांची सुविधा बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे. टाऊनशिप या मोठ्या असतात. १५० ते २०० एकर क्षेत्रात त्या विस्तारलेल्या असतात. अशा ठिकाणी सर्व सुविधा देण्याचे बंधन बांधकाम व्यावसायिकावर असते. विशेष म्हणजे टाऊनशिपमध्ये खरेदीकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. टाऊनशिपमध्येही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
पुण्यात रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट हवा
शहरात दोन नद्या मधोमध वाहतात. गुजरातमध्ये साबरमती रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट होतो, तर पुण्यात का नाही. जलवाहतुकीसाठी या नद्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मुळा आणि मुठा नद्यांचा विकास केल्यास तसेच दुतर्फा उद्याने तयार केल्यास पुण्याच्या सुंदरतेत भर पडेल.
मेट्रोचा अधिक विस्तार करण्याची गरज
मेट्रोचा अधिक विस्तार करण्याची गरज आहे. वाकड, बाणेर, हिंजवडीकडे रोज लाखो लोक प्रवास करतात. त्याप्रमाणे अन्य ठिकाणी पिरंगुट, चाकण, खराडी, वाघोली भागांत मेट्रोचा विस्तार करणे काळाची गरज आहे.
पुण्यात उत्पादनक्षेत्र वाढले पाहिजे
पुण्याच्या आगामी दहा वर्षांत काय झाले पाहिजे याबाबत ते म्हणाले, आयटी आणि उत्पादन क्षेत्र हातात हात घालून चालले पाहिजे. पुण्यात उत्पादन अधिक प्रमाणात वाढले पाहिजे. यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. लॉकडाऊन काळात आयटी क्षेत्र वर्क फ्रॉम होममध्ये होते. त्यामुळे भविष्यात अशीच प्रक्रिया सुरु ठेवण्याचा मानस अनेक कंपन्यांचा आहे. त्यादृष्टीने पुणे राहण्यासाठी उत्तम असल्याने गृहखरेदीला चालना मिळणार आहे. पुण्यातील अनेक मंडळी घरे भाड्याने देऊन मुंबईत राहत होती. ती आता वर्क फ्रॉम होममुळे पुन्हा परतू लागल्याचे चित्र आहे.
घरातील कोपरा बनणार कार्यालय
वर्क फ्रॉम होममुळे घरच आता कार्यालय होणार आहे. त्या दृष्टीने अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नव्या कल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. २ बीएचके फ्लॅटमध्ये कार्यालयाचा फिल यावा यासाठी सुमारे ३० ते ५० फुटांचा भाग घरातील एक कार्यालय म्हणून ठेवला आहे. तेथे कार्यालयात लागणाऱ्या सर्व सुविधांचा समावेश असेल.
(शब्दांकन : दीपक मुनोत)