पुणे : पालिकेची मालकी नसेल त्या ठिकाणी कसलाही आर्थिक खर्च करू नये, असा नियम असताना पालिकेने वैकुंठभाई मेहता रस्त्याचा अपवाद करून त्यावर लाखो रुपयांचे कॉक्रिटीकरण केले. आता त्याच अधिकारात स्थानिक नागरिकांची कोणतीही मागणी नसताना या रस्त्याच्या रुंदीकरणाचा घाट घालून तेथील वृक्षसंपदा संपविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.‘मूठभरांच्या सोयीसाठी हजारो वृक्षांचा घेतला जाणार बळी’ अशा आशयाचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याचे परिसरातील आयसीएस कॉलनी, भोसलेनगर येथील नागरिकांकडून जोदार स्वागत करण्यात आले. पालिकेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात या नागरिकांनी मोहल्ला समिती स्थापन केली असून, त्या माध्यमातून ते शांततापूर्ण आंदोलन करीत आहेत. ‘आमच्या आंदोलनाला या वृत्तामुळे बळ मिळाले,’ अशी भावना या नागरिकांनी व्यक्त केली. ५ डिसेंबरला हे सर्व नागरिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात सकाळी १० वाजता झाडांचा बळी घेऊ नका, अशी मागणी करीत सत्याग्रह करणार आहेत.दरम्यान, पालिकेकडे या रस्त्याची मालकीच नाही, असा आरोप स्थानिक नगरसेवक राजू पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. त्यांच्या प्रभागात हा रस्ता येतो. काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव आला त्या वेळी आपण त्याला विरोध केला. कोणाचीही मागणी नसताना हा लाखो रुपयांचा खर्च का केला जात आहे, अशी विचारणा केली; मात्र त्याची दखल न घेता काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. आताही रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती पवार यांनी दिली. ही मागणीही कोणी केलेली नाही, तरीही कोणाच्या सांगण्यावरून ही तरतूद केली गेली, याबाबत प्रशासन काही सांगायला तयार नाही, असे ते म्हणाले. एकीकडे वृक्षारोपणाच्या गोष्टी करीत पालिका दुसरीकडे या हजारो वृक्षांचा बळी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मी त्याच्या विरोधात आहे, असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.विद्यापीठाशेजारचा हा रस्ता रुंद झालाच तर वाहतुकीचीही फार मोठी समस्या विद्यापीठ चौकात निर्माण होईल. ती लक्षात घेऊन पालिकने वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. मात्र, त्या दृष्टीने काहीही कार्यवाही केली गेलेली नाही. सध्या या रस्त्यावरून मोजक्याच वाहनांची वाहतूक होते.
हस्तांतरित नसतानाही काँक्रिटीकरण
By admin | Published: November 27, 2015 1:47 AM