देशी दारूच्या दुकानाला येथील स्थानिकांचा विचार न करता सरकारकडून परवानगी दिली जात आहे. अशा राज्य सरकारचा धिक्कार असो. गोकुळनगर नागरिकांच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही हे इथल्या आमदार आणि सरकारने जाणून घ्यावे. असे खडतर वक्तव्य करत देशी दारू दुकानाच्या विरोधात माजी आमदारयोगेश टिळेकर यांनी आंदोलन केले.
गोकुळनगर येथे असणाऱ्या श्री गणेश विश्व सहकारी गृहरचना सोसायटीत पाच मार्चला देशी दारूच्या दुकानाचे उदघाटन झाले. सोसायटीची अथवा त्यामधील नागरिकांची अजिबात परवानगी घेतली नाही. त्याचा सोसायटीबरोबरच आसपासच्या नागरिकांनाही त्रास होत आहे. या भागातील आमदारांच्या दबावामुळे हे दुकान चालू झाले आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
टिळेकर म्हणाले, सोसायटीत आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तिच्या प्रवेशद्वाराजवळ हे देशी दारूचे दुकान आहे. सोसायटीत राहणाऱ्या महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांचा जाण्यायेण्याचा हा मार्ग आहे. दारू पिणारी व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण नसते. ते नशेत असताना महिला - भगिनींकडे वाईट नजरेने बघतात. तसेच रात्री अपरात्री शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. अशा वाईट गोष्टींना परवानगी मिळते. त्याबद्दल मी भागातील आमदारांचा जाहीर निषेध करतो. या भागात इस्कॉन टेम्पल, शाळा, शिकवण्या आहेत. नागरिकांनी लाखो खर्च करून याठिकाणी घरे घेतली आहेत. त्यांना अशा गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो हे लज्जास्पद आहे.