नीरा : देशभरात करोनाच्या संसर्गाने मोठा उच्छाद मांडला आहे. त्यातही महाराष्ट्र आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे. कोरोना मृत्यूचा दरही देशाच्या सरासरीपेक्षा जादा आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावले आहेत. यामध्येच विवाह सोहळे हे २०० लोकांमध्ये पार पडावेत, अशी अट शासनाने घातलेली होती. त्यामध्ये बदल करत, आता पुन्हा ५० लोकांमध्ये केली. मात्र, शासनाची ही अट धुडकावत जिल्ह्यात शेकडो लोकांच्या उपस्थित विवाह सोहळे साजरे होत आहेत. प्रशासनाकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
राज्यामध्ये आणि त्यातही मुंबई, पुणे या भागात करोनाचा प्रसार मोठा आहे. शासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या. मात्र, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अनेकांकडून आता टाळेबंदीला विरोध होत आहे. टाळेबंदी करूनही कोरोना आजाराचा प्रसार थांबत नाही, असे या पाठीमागे कारण सांगितले जात आहे. लोकांनी एकत्र येऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणूनच असे वेगवेगळे निर्बंध घातले जात आहेत. मात्र, या निर्बंधाचे लोकांकडून सोईस्कररीत्या उल्लंघन होत आहे.
घालून दिलेले निर्बंधांचे उल्लंघन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये प्रमुख कारण आहे, शहर आणि खेडेगावात होत असलेले विवाह सोहळे. सध्या ज्याप्रमाणे कोरोनाची लाट यावी, त्याचप्रमाणे विवाह सोहळ्याचीही लाट आल्याची पाहायला मिळते आहे. थोडक्यात विवाह उरकून घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो आहे. या सोहळ्याला राज्य सरकारने पूर्वी ५०, २० पुन्हा २०० आणि आता परत ५० लोकांच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडावेत, ही अट घातली आहे. मात्र, या अटीचे उल्लंघन होताना पाहायला मिळते आहे. लोक या सोहळ्याची परवानगी घेताना ५० लोकांची यादी सादर करत असले, तरी सोहळ्याला मात्र पाचशेहून अधिक लोकांची उपस्थिती पाहायला मिळते. विवाहापूर्वीची खरेदी हीही कोरोनाचा प्रसार होण्यासाठी उपयुक्त ठरते आहे. अशा प्रकारच्या बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष दिले, तरच कोरोनाचा होणारा प्रसार थांबू शकेल.