पुणे : विद्येचे माहेरघर, आयटी हब, स्मार्ट सिटीबरोबरच देशातील वेगाने विकसित होणारे आठवे महानगर म्हणून बिरुदावली मिरविणारे पुणे शहर आणि उपनगरांचा परिसर गेल्या काही वर्षांत ज्या वेगाने विकसित होत आहे, त्या तुलनेत वाहतूक मात्र सुधारण्याचे चिन्ह दिसत नाही. सुमार वाहतुकीचे केंद्र बनलेल्या पुण्यामध्ये दोन व्यक्तींमागे एक वाहन, रस्त्यांची लांबी मुबलक असली तरी अरुंद रस्ते, ढेपाळलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि वाहतुकीशी संबंधित विभागांच्या एकमेकांशी नसलेल्या समन्वयामुळे पुणे शहराची वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी नुकताच पुणे आणि मुंबई महानगराच्या वाहतूक व्यवस्थेचा तसेच सद्यस्थितीचा तुलनात्मक अभ्यास केला असून, या अभ्यासातून पुण्याची वाहतूक तसेच वाहतूक सुधारणा व्यवस्था मुंबईच्या तुलनेत अगदीच तकलादू असल्याचेच समोर आले आहे.शहराच्या उद्योग व्यवसायात जशी झपाट्याने वाढ होत चालली आहे, तशी पुण्याची लोकसंख्याही बेडकीच्या पोटाप्रमाणे फुगत चालली आहे. शहरामध्ये येणाऱ्यांसोबत त्यांच्या वाहनांचीही संख्या वाढता वाढे अशीच आहे. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे पुण्यातील रस्ते मुंबईच्या तुलनेत अधिक लांबीचे आहेत. मात्र, रुंदी कमी असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यांवर लागलेल्या नेहमी पाहायला मिळतात. या अरुंद रस्त्यांवरची अतिक्रमणे, पदपथ पथारीवाल्यांनी व्यापलेले असल्यामुळे पादचारी नाइलाजास्तव रस्त्यावरून चालत जातात. मुंबई आणि पुण्याच्या वाहतुकीची तुलना केली असता मुंबईमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या पटीत अधिक चांगली आहे. यासोबतच तेथे वाहतूक पोलिसांची संख्याही पुण्याच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. पुण्याच्या रस्त्यांची लांबी मुंबईच्या रस्त्यांच्या तुलनेत दुप्पट आहे. विशेष म्हणजे पुण्याचे भौगोलिक क्षेत्र मुंबईपेक्षा अधिक असूनही रस्त्यांसाठी जागा मिळत नाही. (प्रतिनिधी)सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्यायच नाहीमुंबईच्या तुलनेत पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय ढेपाळलेली असल्याची स्थिती या तुलनात्मक अभ्यासावरून दिसून येते. पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचा पीएमपी हा एकमेव पर्याय आहे. तर १२ लाख प्रवाशांसाठी अवघ्या २२00 बसेस आहेत. या उलट मुंबईमध्ये बेस्टच्या ४६८0 बसेस असून, बसबरोबरच लोकल टे्रन, मेट्रो तसेच मोनोरेलचीही व्यवस्था आहे.२ व्यक्तींमागे आहे १ वाहनपुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराची लोकसंख्या सुमारे ६0 लाख आहे. मात्र, त्याच वेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ढेपाळलेली असल्याने तसेच इतर पर्यायी साधने उपलब्ध नसल्याने प्रत्येक दोन व्यक्तींमागे जवळपास १ वाहन आहे. त्यामुळे पुणे महानगरातील वाहनसंख्या तब्बल ३१ लाखांच्या वर आहे. याउलट मुंबई महानगराची लोकसंख्या दीड कोटी असतानाही खासगी वाहनांची संख्या अवघी २१ लाख आहे. म्हणजेच प्रत्येकी सात व्यक्तींच्या मागे एक वाहन आहे. पुण्यात प्रामुख्याने दुचाकींची संख्या जवळपास २३ लाखांच्या पुढे असल्याने शहरातील रस्ते वाहतुकीस अपुरे पडत असून, वारंवार वाहतूककोंडी होताना दिसून येते.रस्ते असूनही कोंडी कायम1पुणे महानगराचे क्षेत्रफळ जवळपास ७४३ चौरस किलोमीटर आहे. याउलट मुंबई शहराचे क्षेत्रफळ ४३७ चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे पुणे महानगरात रस्त्यांची लांबी सुमारे ३३५२ किमी आहे. याउलट मुंबईमध्ये अवघे १९४१ चौरस किलोमीटरचे रस्ते आहेत. तर पुणे महानगरात या रस्त्यांवर सुमारे १५0३ चौक असून, त्यातील केवळ ३३५ चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था आहे. 2याउलट मुंबईमध्ये सुमारे १२५0 चौक असून, त्यातील १२३८ चौकांमध्ये सिग्नल व्यस्था आहे. त्यातील तब्बल ५५९ सिग्नल हे स्वयंचलित असून, ते नियमितपणे सुरू असतात. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत पुण्यात रस्त्यांची लांबी जास्त असली तरी या रस्त्यांचे अर्धवट रूंदीकरण, रस्त्यावर ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण, रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग यामुळे त्याचा थेट परिणाम शहराच्या वाहतुकीवर झाला आहे. तर पुणे शहरात अवघे १६ उड्डाणपूल असून, मुंबईत वाहतूककोंडी फोडण्यासाठी असलेल्या उड्डाणपुलांची संख्या तब्बल ५५ आहे. कर्मचाऱ्यांची वानवा- दोन्ही शहरांची तुलना करता पुणे शहरात वाहतुकीची समस्या अधिक असतानाही कर्मचाऱ्यांची वानवा आहे. कर्मचाऱ्यांची नियुक्ती लोकसंख्येच्या आधारे केली जात असल्याने मुंबईत दीड कोटी लोकसंख्येसाठी २५७ वाहतूक अधिकारी, तर ३४९५ कर्मचारी आहेत. याउलट चित्र पुण्यात आहे. पुण्यात अवघे ६६ वाहतूक अधिकारी असून, १0९९ कर्मचारी आहेत. त्यामुळे सरासरी ७ हजार ३00 वाहनांमागे १ पोलीस कर्मचारी उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. तर पुण्यात वर्षाला वाहतूक नियमभंगाचे ११ लाख गुन्हे होतात, तर हा आकडा मुंबईत २१ लाखांचा आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मुंबईत जास्त प्रयत्न होताना दिसतात. यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव- पुणे महानगरात रस्ते विकसित करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, तीन कँन्टोन्मेंट बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए अशा वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. तर मुंबईत पीएमआरडीए ही एकमेव संस्था आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनासाठी आवश्यक असलेले निर्णय एकच यंत्रणा रस्ते विकसित करताना घेते. याउलट पुण्यात प्रत्येक विभाग आपल्या सोयीनुसार रस्ते तयार करतो. त्यांची देखभालही वेगवेगळे विभाग करतात. त्यामुळे खराब रस्त्यांचा थेट परिणाम शहराच्या वाहतुकीवर होताना दिसून येतो.
समन्वयाअभावी कोंडले पुणे
By admin | Published: September 02, 2016 5:53 AM