लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जेव्हा जेव्हा भाजपाच्या विरोधात तीन पक्ष एकत्र आले, तेव्हा निवडणुकीत भाजपचाच विजय होऊन संख्याबळ वाढले आहे, असा दावा करत माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी देशातील विविध राज्यातील दाखले दिले. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच पुण्यात बहुमताने विजयी होईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. “एकीचे बळ दाखवीत आपण आगामी निवडणुकांना सामोरे जावे,” अशी लस देऊन फडणवीसांनी भाजपाच्या नगरसेवकांना पुण्याला रवाना केले.
पुण्यातील भाजपा नगरसेवकांसाठी भाजपाने उत्तान येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे दोन दिवसांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. भाजपाच्या एकूण एक नगरसेवकांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना हे शिबिर अनिवार्य करण्यात आले होते. यात फडणवीस बोलत होते.
कोरोना महामारीमुळे वर्षभर विकासकामे रखडली. त्यातच दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने आघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. यामुळे वर्षभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपापुढे पुण्यात मोठे आव्हान असेल असे चित्र आहे. त्यातच भाजपात फूट पडून काही नगरसेवक सत्ताधारी पक्षांमध्ये जातील अशीही चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी नगरसेवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
शिबिरात पक्षाच्या इतिहासापासून, निवडणूक तयारीपर्यंतच्या सर्व विषयांवर बौद्धिक घेण्यात आले. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सरचिटणीस श्रीकांत चिटणीस यांनी पहिल्या दिवशी मार्गदर्शन केले़ शुक्रवारच्या सत्रात शैलेंद्र देवळाणकर, माजी मंत्री आशिष शेलार आणि समारोपप्रसंगी फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
सभागृह नेते गणेश बिडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की काही नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार हा दावा या प्रशिक्षण शिबिरातून मोडीत निघाला. आम्ही सर्व एकसंध आहोत. आगामी निवडणुकीत भाजपचाच झेंडा पुन्हा महापालिकेवर फडकविणार, असा विश्वास आम्ही फडणवीस यांना दिला़
---------------------------
फोटो मेल केला आहे़