पुणे : आईला दरमहा 5 हजार रूपये पोटगी देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून पोटगी भरण्यास कसूर केल्याप्रकरणी न्यायालयाने मुलाची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी.एम निराळे यांनी हा आदेश दिला आहे. न्यायालयाने मुलास आईला दरमहा पाच हजार रूपये इतकी पोटगी देण्याचे आदेश दिले होते. परंतु मुलाने आईला पोटगी दिली नाही व न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले . मुलाने पोटगी भरण्यास कसूर केल्याने ही पोटगीची थकबाकी रक्कम 4 लाख वीस हजार इतकी बाकी राहिल्याने न्यायालयाने सदर रकमेकरिता मुलाची जी जंगम मालमत्ता आहे ती जप्त करावी असे आदेश बंडगार्डन पोलिसांना दिले आहेत. या केसमधील महिलेच्या पतींचे निधन झाले आहे.
त्यांचा मुलगा हा त्यांना सांभाळत नसल्याने त्यांनी अॅडव्होकेट सुरेंद्र आपुणे व रमेश परमार यांच्या वतीने न्यायालयांमध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना दरमहा रक्कम रुपये पाच हजार इतकी पोटगी मंजूर केली होती व मुलास ती भरण्याचे आदेश दिले होते.महिलेला जगण्याकरिता पोटगी व्यतिरिक्त इतर कुठलेही साधन नाही. लॉकडाऊन पूर्वी न्यायालयाने मुलाला काही पोटगी करिता काही रक्कम भरण्यास सांगितले होते. परंतु त्याने न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले म्हणून न्यायालयाने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट मुलाच्या विरूद्ध काढले.
-------------