पुणे : एफआरपी थकबाकीच्या कारणावरून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी आणखी ४ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई केली. याआधीही त्यांनी १३ कारखान्यांवर अशीच कारवाई केली आहे.
संत दामाजी व भीमा रामजी या सोलापूरमधील २ व किसनवीर, खंडाळा सातारा, जयभवानी, बीड या दोन अशा एकूण ४ कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसासाठी द्यायच्या रकमेचा पहिलाच हप्ता थकवला म्हणून जप्तीची नोटीस बजावली. उत्पादित साखर तसेच कारखान्याची मालमत्ता जप्त का करू नये, अशी विचारणा त्यात केली आहे. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याबाबत कळवण्यात आले आहे.
शेतकऱ्याने कारखान्याला गाळपासाठी ऊस दिल्यानंतर १४ दिवसांच्या आत कारखान्याने त्याला त्याच्या उसाच्या रास्त किफायतशीर रकमेपैकी पहिला हप्ता देणे बंधनकारक आहे. कारखाने शेतकऱ्यांचे पैसे थकवत असल्याने हा नियम केला आहे.