पुणे : वेळोवेळी आवाहन, अभय योजना राबवूनही मिळकतकर न भरणाऱ्या मिळकतकरदारांविरुद्ध महापालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे. प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांच्या बालेवाडी येथील हॉटेल आॅर्किडवर मिळकतकर न भरल्याप्रकरणी शनिवारी पालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. गेल्या १५ दिवसांत हॉटेल आॅर्किडसह पालिकेने १० मिळकतींना सील ठोकून त्या जप्त केल्या आहेत.मिळकतकराची थकबाकी असलेल्या मिळकतदारांना गेल्या काही दिवसांपासून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. थकबाकी ३१ डिसेंबरपर्यंत भरल्यास दंडाच्या रकमेमध्ये मोठी सूट देण्याची अभय योजनाही पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेकडून मिळकत करवसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. बालेवाडी येथील हॉटेल आॅर्किडकडे ४ वर्षांपासून १२ कोटी रुपयांची थकबाकी भरलेली नव्हती. त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावूनही थकबाकी भरली जात नसल्याने अखेर पालिका प्रशासनाकडून हॉटेल आॅर्किडला सील ठोकून त्यावर जप्तीची कारवाई केली आहे. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. गुरुवारी कोरेगाव पार्क येथील रेस्टारंट बार, डार्क हाऊस सह ४ मिळकती सील करून त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे २०१० पासून १० लाख ४४ हजार रूपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबर नगररोड क्षेत्रिय कार्यालय, ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालय, येरवडा क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. मिळकत कर विभागाच्यावतीने ३ सहायक कर आकारणी प्रमुख, ५ बँड पथके, १० स्पेशल वसुली पथके, २४ विभागीय निरीक्षक, १२५ पेठ निरीक्षक यांच्यामार्फत ही मोहीम राबविली जात आहे. मोठया व्यावसायिक मिळकतींनी कर भरला नसल्यास त्यांच्या गेटपुढे बँड वाजवून वसुलीची कारवाई केली जात आहे. मोठयाप्रमाणात थकबाकी असल्यास मिळकतींना सील ठोकले जात असल्याची माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांनी दिली. ७ महिन्यांत ७७६ कोटींची वसुली महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या वतीने गेल्या ७ महिन्यांमध्ये ७७६ कोटी रुपयांची वसुली केली आहे. थकबाकीच्या वसुलीसाठी यंदा विशेष अभय योजना राबविली जात आहे.
कर थकल्याने आॅर्किड हॉटेलवर जप्ती
By admin | Published: November 06, 2016 4:37 AM