चाकण : देशभरात कोरोना विषाणू संसर्ग सुरू झाल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. कोरोना संकटामुळे शाळा मार्च २०२० पासून बंद आहेत. शाळांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे. खासगी व विनाअनुदानित शाळांच्या फीच्या प्रश्नांवरुन शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संघर्ष होत असल्याचं चित्र आहे. खेड तालुक्यातील सर्वच शाळांनी फीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोरोना महामारीसह सततच्या लॉकडॉउनच्या पार्श्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे मोठे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत खासगी इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शैक्षणिक संस्था कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही शिक्षण संस्था शैक्षणिक शुल्कात एक रुपयाही कमी करण्यास तयार नाही. ज्या सुविधा वर्षभर पुरवल्या नाहीत. त्या सुविधांचे शुल्कही मागील वर्षी शैक्षणिक संस्थांनी वसूल केले आहे. कोरोना महामारीच्या काळातही शिक्षण संस्था आपला नफा सोडायला तयार नाहीत, असे पालक सांगत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांकडे आणि त्यांच्या पालकांकडे शैक्षणिक शुल्क भरण्याची आर्थिक क्षमताच नाही. शुल्क कमी केले नाही आणि ते भरण्यासाठी तगादा लावला तर विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडण्याशिवाय पर्याय नाही. तर विद्यार्थी शुल्काअभावी शिक्षण संस्थेत येऊ शकला नाही तर शिक्षण संस्था टिकणार तरी कशा हाही प्रश्न निर्माण होणार आहे. विद्यार्थी शिकलाच नाही तर राष्ट्राचे भवितव्य काय असणार आहे? असा सवाल शिक्षणतज्ज्ञांनी केला आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापन आपली मनमानी करत फी वसूल करत आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा अनेक शिक्षण संस्थांनी शाळा बंद असताना ही फी वसूल केली. ज्यांनी फी भरली नाही त्यांना शाळेतून काढण्यात आलं आहे, असा मनमानी कारभार या शाळा करत आहे. यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
- साजिद मुलाणी, पालक.
खेड तालुक्यातील खासगी आणि विनाअनुदानित शाळांनी फीसाठी पालकांना वेठीस धरले आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि सरकार गंमत बघत आहे. कोरोनाच्या दणक्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सरकार फक्त घोषणा करण्यात आघाडीवर आहे. प्रत्यक्षात पालकांना न्याय देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. - निर्मल साबळे, पालक.
ज्या शाळा फीसंदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांना त्रास देत असतील अशा शाळांची खेड तालुका पालक संघाकडे तक्रार आल्यास त्याचे निवारण केले जाईल - बाळासाहेब सांडभोर - अध्यक्ष, खेड तालुका विद्यार्थी पालक संघ.