यवत येथील गुरुदत्त इंटरप्रायजेस मधून दौंड व पूर्व हवेली मधील हॉस्पिटल साठी ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र मागणी जास्त व पुरवठा कमी होत असल्याने दोन्ही तालुक्यात वारंवार संघर्ष निर्माण होत आहे. महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली येथील प्रकल्पातून सध्या ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असला तरी दौंड महसूल व हवेली महसूलच्या अधिकाऱ्यांच्या कात्रीत प्रकल्प सापडला आहे. यामुळे ऐकायचे कोणाचे असा प्रश्न प्रकल्प चालविणाऱ्यांना पडत आहे.
मंगळवार (दि.२०) रोजी देखील असाच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दोन्ही तालुक्यात संघर्ष झाला होता. त्यावेळी दौंड तालुक्यातील प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा रोखल्याचा आरोप हवेलीने केला होता. गुरूवारी (दि.२९) देखील परत असाच संघर्ष पाहायला मिळाला. सकाळी हवेलीचे अपर तहसीलदार विजयकुमार चौबे यांनी यवत येथील प्रकल्पावर येऊन हवेलीच्या वाट्याला ठरलेल्या कोट्यप्रमाणे ऑक्सिजन घेणार मग दौंडला द्या अशी भूमिका घेतली. मात्र कालच ऑक्सिजन अभावी दौंड तालुक्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने दौंडला आवश्यक पुरवठा करावी अशी भूमिका दौंड मधील कार्यकर्त्यांनी घेतली.
हवेली अपर तहसीलदार विजयकुमार चौबे यांनी ठोस भूमिका घेत हवेली तालुक्यात ऑक्सिजनची कमतरता असून तेथे देखील रुग्णांना जगविण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असल्याचे सांगितले. तर दौंड तालुक्याने त्यांचा ठरलेला कोटा आधीच घेतला असल्याची भूमिका घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे आपण पालन करत असून कोणी अडवणूक केल्यास सरळ गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा दिला.
यावेळी दौंडचे नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, सचिन आखाडे, मंडल अधिकारी दीपक कोकरे, महेश गायकवाड, तलाठी भाटे, भांगे, जगताप उपस्थित होते. तर दौंड तालुक्यातील संदीप दोरगे, इम्रान तांबोळी, विकास दोरगे यांनी आगोदर दौंड तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता यवत मधील प्रकल्पातून करावी आणि मगच हवेली तालुक्यात ऑक्सिजन द्यावा अशी भूमिका घेतली.
दुपारी अडीच वाजल्यानंतर दौंडचे तहसीलदार संजय पाटील यवत मधील ऑक्सिजन प्रकल्प स्थळावर आले. त्यानंतर हवेलीचे अपर तहसीलदार चौबे यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपलब्ध असलेल्या २५० पैकी १४० सिलिंडर हवेली साठी व ११० सिलिंडर दौंड तालुक्याला देण्याचे निश्चित करण्यात आले.
चौकट :-
दौंडच्या कार्यकर्त्यांची निराशा....
दौंड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची अवस्था गंभीर बनत चालली आहे. कालच चार रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीत दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठोस भूमिका मांडून यवतमधील प्रकल्पासाठी द्रव ऑक्सिजनचा पुरेसा साठा मिळवून आगोदर दौंड तालुक्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन द्यावा अशी मागणी उपस्थित दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केली.
फोटो ओळ :- यवत येथील गुरूदत्त इंटरप्रायजेस मेडिकल ऑक्सिजन प्रकल्पात दौंड व हवेलीच्या ऑक्सिजन पुरवठ्या बाबत चर्चा करताना महसूल विभागाचे अधिकारी