कळस : चालू अर्थसंकल्पात सरकारने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मागील अनुशेषासह २ हजार कोटींची तरतूद केली नाही तर धनगर समाज व सरकार हा संघर्ष अटळ आहे, असा इशारा यशवंत प्रहार सेनेचे प्रमुख शशिकांत तरंगे यांनी दिला.
समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या रुई (ता. इंदापूर) येथील बाबीरदेवाला दुग्धाभिषेक घालून समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला सद्बुद्धी देण्याची मागणी करण्यात आली.
तरंगे म्हणाले की, चालू अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजाच्या उन्नतीसाठी २ हजार कोटी रुपये व २२ योजनांची तरतूद राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी करावी. धनगर समाजाला राजकीय पक्ष वापरून घेत आहेत, राजकीय पक्षांनी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ केला आहे. कालच एका स्मारकासाठी ४०० कोटी दिले आहेत, आम्ही जिवंत माणसांना १ हजार कोटी रुपये मागतो आहोत, आमचा समाज हा वंचित आहे, समाज हा भरडला जात आहे, त्यामुळे आंदोलन करावे लागत आहे. आरक्षणासाठी यापूर्वी औरंगाबाद व पैठण येथील युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाजातील युवकांनी ही आरक्षणासाठी आत्महत्या केली तेव्हा त्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी दिली तसेच आर्थिक मदत केली मात्र आमच्या बाबतीत वेगळा न्याय दिला जात आहे ही दुजाभावाची भावना बदलली पाहिजे.
मागील वर्षाची १ हजार कोटीची तरतूद व चालू वर्षीचे १ हजार कोटी असे अनुशेष भरून २ हजार कोटींची तरतूद करण्यात यावी चालू अर्थसंकल्पात सरकारने तरतूद केली नाही तर धनगर व सरकार संघर्ष हा अटळ आहे, असा इशारा देण्यात आला. यावेळी अप्पासाहेब माने, भाजपचे माजी इंदापूर शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य माऊली चवरे, गजानन वाकसे, अजितसिंह पाटील, यशवंत कचरे, आबा थोरात, तानाजी मारकड उपस्थित होते.